कोविड रूग्णांसाठी डॉ.गौतम छाजेड व डॉ.मनिषा छाजेड चालवतायेत २४ तास मदत केंद्र

सतिश वौजापुरकर
Wednesday, 30 September 2020

डॉ. मनिषा छाजेड या राहाता येथील डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या भगिनी आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, डॉ. गौतम छाजेड यांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्यभरालीत अनेक कोविड रूग्ण व त्यांच्या कुटूंबियांना उपयुक्त ठरला.

शिर्डी (अहमदनगर) : विविध जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी विनामोबदला मदत केंद्र चालविण्याचा उपक्रम पुणे येथील डॉ. गौतम छाजेड व त्यांच्या पत्नी डॉ. मनिषा छाजेड हे राबवत आहेत. पुण्यातील विवीध रूग्णालयांत बेड उपलब्ध करण्यापासून ते तेथील नामांकित डॉक्टरांचा सल्ला देखील या मदत केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. राहाता परिसरासह नगर जिल्ह्यातील अनेक कुटूंबाची त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ कमी झाली. मेडीको हेल्पलाईन या नावाने हा उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून निशुल्क राबविला जातो.
 
डॉ. मनिषा छाजेड या राहाता येथील डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या भगिनी आहेत. या उपक्रमाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, डॉ. गौतम छाजेड यांनी सुरू केलेला हा उपक्रम राज्यभरालीत अनेक कोविड रूग्ण व त्यांच्या कुटूंबियांना उपयुक्त ठरला. पुणे शहरातील सुमारे दोनशे नामांकित डॉक्टर या माध्यमातून जोडले गेले. त्यातील २२ डॉक्टर तर आमच्या सोबत अहोरात्र उपलब्ध असतात. 

नगर जिल्ह्यातील अनेक रूग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आम्हाला दररोज सुमारे २५० ते ३०० रूग्ण व त्यांचे कुटूंबीय फोनद्वारे मदतीसाठी संपर्क साधतात. त्यांना कोविडबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. त्यांच्या रक्त व लघवी चाचण्याचे विश्लेषण करून वैद्यकिय सल्ला देतो. पुण्यात तर गरजू रूग्णांना घरपोच औषधे देखील देतो.

डॉ. गौतम छाजेड म्हणाले, आमच्याकडे आजवर अठरा हजार कोविड रूग्णांचा डाटा संकलित झाला आहे. या सर्वांवर एकतर आम्ही टेलीमेडीसीनद्वारे उपचार केले आहेत. किंवा विविध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले आहेत. या सर्वांच्या उपचाराचे व चाचणी अहवालांचे बारीक विश्लेषण केले आहे. रूग्णाने सूरवातीलाच संपर्क साधला तर त्याला आम्ही रक्त व लघवीची चाचणी (सीबीसी, सीआरपी, युरीन रूटीन) करायला सांगतो.

अवघ्या पाचशे रूपयात आणि तासाभरात कुठल्याही मोठ्या गावात हि चाचणी होते. त्याआधारे आम्ही रूग्ण पाॅझीटीव्ह कि निगेटीव्ह याचे निदान लगेचच करतो. लक्षणे सौम्य की त्रिव हे देखील ठरवू शकतो. पाॅझीटीव्ह असेल तर लगेचच उपचार सुरू करण्याचा सल्ला देतो. आॅक्सिमिटरद्वारे त्याच्या प्राणवायूच्या पातळीची सहा मिनीटांची चाचणी दररोज करण्याचा सल्ला देतो. त्या आधारे गरज भासली तर छातीचा सिटी स्कॅन व त्या अहवालानंतर पुढील उपचार सुरू करण्याचा सल्ला देतो.

आजवर अठरा हजार रूग्णांवर अशा पध्दतीने उपचार केले. त्यात बारा हजार लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले होते. केवळ साडेचारशे रूग्णांना रूग्णालयात दाखल करावे लागेल. अन्य आजारानेग्रस्त असलेल्या दोघांचा रूग्णालयात मृत्यु झाला. रूग्णाला शक्यतो रूग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये. तो घरीच बरा व्हावा. हा आमचा मुख्य उद्देश आहे.

मेडीको हेल्पलाईनचे डॉ. गोतम छाजेड  म्हणाले, लक्षणे नसलेल्या रूग्णांकडून संसर्ग फैलावला जाण्याचा धोका मोठा असतो. विनामास्क घराबाहेर पडणे याचा अर्थ स्वतःला कोविडच्या स्वाधिन करणे असा होतो. राज्याच्या विविध भागातील सेवाभावी डाॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते आपणहून पुढे येऊन आमच्या मदत केंद्रासोबत जोडले जात आहेत. कुठलाही मोबदला न घेता ही सेवा सुरू आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Gautam Chhajed and his wife Dr. Manisha Chhajed is running a 24 hour help center for Covid patients