डॉ. सुजय विखे पाटलांचे मोदींना अॉनलाईन दिवाळी गिफ्ट

सतीश वैजापूरकर
Monday, 2 November 2020

या गिफ्ट बॉक्‍समध्ये, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साईबाबांचे चित्र, हे एक आकर्षण असेल. ऑनलाइन पद्धतीने ही अनोखी भेट पाठविण्यासाठी गुगलच्या सहकार्याने सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

शिर्डी ः साईबाबांच्या समाधीवरील फुलांपासून धूप, अगरबत्ती, सब्जाचा गंध असलेली मेणबत्ती, गायीच्या शेणाचे आवरण असलेला धूप, झेंडूचा अष्टगंध, अशा पूजेसाठीच्या विविध वस्तू तयार केल्या जातात.

दिवाळी भेट म्हणून या वस्तू, तसेच साईबाबांचा फोटो आणि ध्यान करण्यासाठी उपयुक्त ध्वनिफीत यांचा समावेश असलेले "साई गिफ्ट बॉक्‍स' तयार करण्यात आले आहेत. ते मित्रांना पाठविण्याचे आवाहन साईभक्तांना केले जाईल. येत्या गुरुवारी (ता. पाच) खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे ही अनोखी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑनलाइन पद्धतीने पाठवून या उपक्रमास प्रारंभ करतील. 

साईसमाधीवर रोज वाहिल्या जाणाऱ्या फुलांपासून पूजेसाठीच्या वस्तू तयार केल्या जातात. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अडीचशे ते तीनशे महिलांना रोजगार मिळाला.

साईबाबांची सुबक चित्रे रेखाटणारे कलाकार म्हणून हेमंत वाणी येथे परिचित आहेत. त्यांच्या पुढाकारातून या पूजेच्या वस्तूंचा समावेश असलेले "गिफ्ट बॉक्‍स' ऑनलाइन पद्धतीने दिवाळीनिमित्त इष्टमित्रांना पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. ही कल्पना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आवडली. त्यांनी पंतप्रधान व देशातील सर्व खासदार आणि राज्यातील आमदारांना पाठविण्यासाठी एक हजार "साई गिफ्ट बॉक्‍स' खरेदी केले.

या गिफ्ट बॉक्‍समध्ये, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साईबाबांचे चित्र, हे एक आकर्षण असेल. ऑनलाइन पद्धतीने ही अनोखी भेट पाठविण्यासाठी गुगलच्या सहकार्याने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याद्वारे नोंदणी व कुरिअर सेवेद्वारे ही भेट घरपोच करण्याची व्यवस्था केली आहे. 

साई उदबत्तीसाठी छोटासा लाकडी स्टॅंड या गिफ्ट बॉक्‍समध्ये असेल. ध्वनिफीत सुरू करायची, उदबत्ती लावून साईध्यान करायचे, साईसमाधीवरील फुलांपासून तयार केलेल्या पूजेच्या वस्तू वापरून साईबाबांसोबतचे भावनिक नाते जपायचे, अशी कल्पना यामागे आहे. दीड हजारांचे हे गिफ्ट बॉक्‍स घेतले, की त्यातील 51 रुपये साईसंस्थानकडे अन्नदानासाठी जमा होतील. 
 

साईबाबांच्या समाधीवरील फुलांपासून, बचतगटांतील महिला अगरबत्ती, धूप, सब्जाचा गंध असलेली मेणबत्ती, अशा पूजेच्या वस्तू तयार करतात. साईसमाधीवर फुलांचे हार वाहिले जातात. त्याच्या दोऱ्यापासून आम्ही राख्या बनविल्या. मागील राखीपौर्णिमेला त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठविल्या होत्या. 
- शालिनी विखे पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sujay Vikhe Patil's online Diwali gift to Modi