डॉ. सुनीला वहिनी गेल्या अन राहुरी तालुका हळहळला

Dr. Sunila Kulkarni passes away
Dr. Sunila Kulkarni passes away

राहुरी  : तालुक्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुनीला शांताराम कुलकर्णी (वय 80, रा. राहुरी) यांचे आज (सोमवारी) दुपारी अल्प आजाराने निधन झाले.

शहरातील पहिल्या प्रसुतीगृहातून तब्बल चाळीस वर्षे वैद्यकीय सेवा देतांना गरीब महिला रुग्णांसाठी त्या 'देवदूत' समजल्या जात होत्या. तालुक्यातील एका पिढीने या प्रसुतीगृहात जन्म घेतला, अशी त्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते.

सुनीला वहिनी या नावाने त्या परिचित होत्या. त्यांच्या सासूबाई सुशीला (काकू) यांनी 1960 साली राहुरी शहरात पहिले प्रसूतीगृह सुरू केले. त्यांच्या मागे सुनीला वहिनी यांनी नगर येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन, प्रसूतीगृहाची धुरा हाती घेतली.

तब्बल चार दशके वैद्यकीय सेवेत गरिबांच्या देवदूत बनल्या. पैसे असो वा नसो, गर्भवती महिलांची हमखास सुखरूप सुटका होत असे. त्यांनी शहरातील महिलांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वरी महिला मंडळ स्थापन केले. त्याद्वारे काडीपेटी कारखाना काढला. महिलांना धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण व्हावी. यासाठी महिलांचे भजनी मंडळ तयार केले. ते आजही कार्यरत आहे. 

वैद्यकीय व्यवसायातून समाजाच्या विविध घटकांशी त्यांचा चांगला संपर्क आला. त्याचा उपयोग त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात झाला. राहुरी पिपल्स बँकेच्या संचालकपदी प्रचंड मतांनी विजयी होऊन, त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे सांभाळली.

बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी मदत केली. नागरी बँकेच्या जिल्हा पातळीवर राहुरीचे प्रतिनिधित्व केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागील काही वर्षांपासून त्यांनी वैद्यकीय सेवा बंद केली. त्यांचे चिरंजीव डॉ. जयंत व सूनबाई डॉ. चेतना दवाखान्याची जबाबदारी सांभाळत आहेत.

दुसऱ्या सुनबाई डॉ. शुभा पॅथॉलॉजी लॅबद्वारे सेवा करीत आहेत. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उद्यान विद्याप्रमुख डॉ. श्रीकांत कुलकर्णी व रोटरी ब्लड बँकेचे अध्यक्ष राहुरी पालिकेचे माजी नगरसेवक डॉ. जयंत कुलकर्णी यांच्या त्या मातु:श्री होत. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com