सराईत गुन्हेगार आत्महत्येसाठी चढला मोबाईल टॉवरवर, पोलिसांची रात्री बारापर्यंत तारांबळ

Drunkard attempts suicide by climbing a mobile tower
Drunkard attempts suicide by climbing a mobile tower

राहुरी : राहुरी खुर्द येथे काल (रविवारी) रात्री "शोले' चित्रपटाची आठवण व्हावी, असा "हाय व्होल्टेज ड्रामा' झाला. सराईत गुन्हेगार दारूच्या नशेत आत्महत्या करण्यासाठी थेट मोबाईल कंपनीच्या मनोऱ्यावर चढून पाचशे फूट उंच जाऊन बसला. पोलिस व अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास त्याचे समुपदेशन केले.

अखेर त्याची मनधरणी करण्यात त्यांना यश आले नि रात्री बारा वाजता या "खेळा'वर पडदा पडला. राहुरी खुर्द येथील ऍक्‍सिस बॅंकेच्या मागील बाजूस एका मोबाईल कंपनीचा मनोरा आहे. त्यावर चढण्यासाठी सरळ शिडी आहे. मनोऱ्याच्या दुरुस्तीची कामे करताना बैठकीसाठी पाचशे फूट उंचीवर एक प्लॅटफॉर्म आहे. त्यापुढे आणखी 20 फुटांवर मनोऱ्याच्या टोकाजवळ आणखी एक प्लॅटफॉर्म आहे. रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान 520 फुटांवर जाऊन हा आरोपी बसला.

या बाबत माहिती मिळताच रात्री नऊ वाजता पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. 
दारूच्या नशेत असलेला हा तरुण सतत आत्महत्या करणार असल्याचे बोलत होता. रात्री दहा वाजता अग्निशामक बंबासह पालिकेचे पथक हजर झाले.

अग्निशामक दलाचे प्रमुख राजेंद्र पवार, बाळासाहेब पवार, सुरेश वाघ, विलास गडाख, नंदू मोरे यांनी तरुणाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तरुणाचा मित्र अमोल गायकवाड व अग्निशामक कर्मचारी नंदू मोरे काळ्याकुट्ट अंधारात बॅटरीच्या उजेडाच्या साहाय्याने मनोऱ्यावर चढले. मात्र, जवळ आल्यास खाली उडी मारण्याची धमकी त्याने दिली. तब्बल दीड तास त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर त्यास आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले. त्याला खाली उतरवून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अहमदनगर

मनोऱ्यावर चढलेला तरुण सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात चोरीच्या चार गुन्ह्यांची नोंद आहे. दारूच्या नशेत चोऱ्या करणे, रस्त्यात मधोमध झोपणे, असे प्रकार त्याने पूर्वी केले आहेत. दारू प्यायल्यानंतर तो स्वतःवरील नियंत्रण गमावतो. अन्य वेळी सभ्य वागतो. त्याचे व्यसन सुटण्यासाठी प्रयत्न करावेत, असे नातेवाइकांना सांगितले आहे. 
- गणेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक, राहुरी 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com