म्हणून आता "जायकवाडी'ला पाणी सोडायची गरज नसेल!

सतीश वैजापूरकर
Friday, 7 August 2020

सह्याद्रीच्या पूर्वेला, पर्जन्यछायेचा प्रदेश समजल्या जाणाऱ्या भागात यंदा अनपेक्षितपणे जोरदार पाऊस पडतो आहे.

शिर्डी (अहमदनगर) : सह्याद्रीच्या पूर्वेला, पर्जन्यछायेचा प्रदेश समजल्या जाणाऱ्या भागात यंदा अनपेक्षितपणे जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 54 टक्‍क्‍यांवर गेला आहे. या धरणात रोज दीड टीएमसी पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे यंदा वरच्या बाजूच्या धरणांतून तिकडे पाणी सोडण्याची आवश्‍यकता भासणार नाही.

भंडारदरा, मुळा, गंगापूर व दारणा या धरणात पाण्याची आवक मंद गतीने सुरू असली, तरी येत्या दोन दिवसांत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सूनचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे. या धरणांत पाणीसाठ्याचा वेगदेखील वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाने मार्ग बदलल्याने खरीप व फळबागांचे मोठे नुकसान सुरू आहे. तथापि, धरणातील पाणीसाठ्यांची परिस्थिती मात्र दिलासा देणारी ठरणार आहे. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा प्रथमच जोरदार पाऊस पडतो आहे. रोज एक ते दीड टीएमसी पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात या धरणात तब्बल सतरा टीएमसी नवा पाणीसाठा तयार झाला. आणखी नऊ टीएमसी पाणीसाठा वाढला, की या धरणात वरच्या बाजूच्या धरणांतून पाणी सोडण्याची गरज राहणार नाही. येत्या आठ दिवसांत हा पाणीसाठा तेथे तयार होईल, अशी सध्याची स्थिती आहे. 

भंडारदरा धरणात यंदा चार टीएमसी नव्या पाण्याची आवक व 52 टक्के पाणीसाठा झाला आहे. निळवंडे धरणात अडीच टीएमसी नवे पाणी आले व एकूण साठा 51 टक्के झाला, मुळा धरणात साडेपाच टीएमसी नवे पाणी आले, तर एकूण पाणीसाठा 47 टक्के झाला. गंगापूर धरणात तीन टीएमसी नवे पाणी आले असून, एकूण पाणीसाठा 51 टक्के झाला.

दारणा धरणात पाच टीएमसी नवे पाणी आले, एकूण पाणीसाठा 73 टक्के झाला. 
या सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अवघ्या दोन महिन्यांत वार्षिक सरासरी पूर्ण करीत आणली आहे. बऱ्याच ठिकाणी रोज पाऊस होत असल्याने खरीप पिके व फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. 

अरबी समुद्रावर मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे. येत्या दोन दिवसांत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तसे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. तसे झाले तर सर्व धरणे आठवडाभरात भरतील, अशी आशा आहे. 
- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rains east of Sahyadri water storage of Jayakwadi dam is 54 percent