सात- बारा उतारा देणे शक्य होईना; सर्व्हरमधील दोषामुळे तलाठ्यांना डोकेदुखी 

विनायक दरंदले
Friday, 6 November 2020

सर्व्हरमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या वाढत्या त्रासानंतर डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

सोनई (अहमदनगर) : सर्व्हरमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या वाढत्या त्रासानंतर डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे तहसीलदारांना देण्यात आले. 

नेवाशाचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डीआयएलआरएमपी सर्व्हर एक महिन्यापासून बहुतांश वेळ बंदच असतात. तलाठ्यांच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रोज कार्यालयीन वेळेत सर्व्हरची गती कमी असते. बंद राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे शक्‍य होत नाही, तसेच ई-फेरफारची कामेही प्रलंबित आहेत. रोज तेच ते उत्तर ऐकून खातेदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे तलाठी व शेतकरी यांच्यात वादाची स्थिती निर्माण होत असल्याने, मंडलाधिकारी व तलाठी तणावात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. 

तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल गव्हाणे, सरचिटणीस बद्रिनाथ कमानदार उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to server down it is difficult to give sat bara transcripts to Talathi