डांबरी रस्त्याला मातीचे ठिगळ; गेल्या पाच वर्षात निकृष्ट रस्ते झाल्याचा आरोप

सुनील गर्जे
Wednesday, 19 August 2020

पाच वर्षात निकृष्ट रस्त्यांच्या कामांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या नेवासे तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी एक प्रताप केला आहे. तो म्हणजे लाखो रुपये खर्च करून नेवासे फाटा ते कुकाणे या डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर केला आहे.

नेवासे (अहमदनगर) : पाच वर्षात निकृष्ट रस्त्यांच्या कामांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या नेवासे तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी एक प्रताप केला आहे. तो म्हणजे लाखो रुपये खर्च करून नेवासे फाटा ते कुकाणे या डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर केला आहे.

दरम्यान मातीने खड्डे बुजविण्याचे दुसर्‍यादिवशी आलेल्या हलक्याशा पावसाने सर्व माती वाहून गेल्याने रस्त्याची आवस्था ‘जैसे थे' झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारचे लाखो रुपये पाण्यात गेले. 

राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आले आणि महिन्याभराच्या आताच कोरोना महामारीने राज्यात थैमान घातले. कोरोना संकटामुळे महाराष्ट्र सरकार आर्थिक अडचणीत असल्याने पुढील एक-दिड वर्षभरात तरी रस्त्यांसह इतर विकासकामांना निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 

शासनाची ही अडचण सर्वसामान्य नागरीक समजू शकतो. मात्र सरकार आर्थिक अडचणीत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी दीर्घकाळासाठीची उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र सार्वजनिक विभागाच्या आशीर्वादाने दोन वर्षांपासून नेवासे फाटा ते कुकाणे या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाल करणार्‍या ठेकेदाराने डांबरी रस्त्यावर असलेले खड्डे चक्क मातीने बुजविण्याचा प्रताप केला. 

दरम्यान मातीने खड्डे बुजवल्यानंतर दुसर्‍याच दिवशी झालेल्या जोरदार पावसाने या खाद्यातील माती वाहून गेल्याने पुन्हा नेवासे फाटा ते कुकाणे हा दुरुस्त केलेला रस्ता एका पावसातच 'जैसे थे' झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सार्वजनिक विभाग व ठेकेदाराने तालुक्यातील अनेक रस्त्यांचे कामे घाईघाईने उरकून घेतली. मात्र ही कामे निकृष्ट झाल्याने पाहिल्याच पावसाने या रस्त्यांची 'वाट' लागली. तेव्हापासून आजपर्येंत सार्वजनिक बांधकाम विभागाने 'फक्त खड्डे बुजविण्यासाठीच लाखो रुपये खर्च करून पैसा पाण्यातच घातला.

तत्कालीन लोकप्रतींनिधींच्या काळात नेवासे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या पाच वर्षात झालेल्या सर्व कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई कराण्याची मागणी महाराष्ट्र लहुजी सेनेचे अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांनी केली आहे.

नियम धाब्यावर
डांबरी रस्त्यावरीक खड्डे बुजविण्यासाठी चुरी आणि डांबाराचाच उपयोग केला जातो. शिवाय हे खड्डे चुरी आणि डांबरानेच बुजविण्याचा नियम आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने हे सर्व नियम धाब्यावर बसवून शासन व नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर केला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: During the BJP government there were potholes on the roads due to poor road works