esakal | कोविड सेंटरमधील पेशंटचे बाहेर जाऊन नाष्टा-पाणी, पाथर्डीकर धास्तावले
sakal

बोलून बातमी शोधा

Eating out of the positive patient at the Covid Center

पाथर्डी शहरात कोरोनाबाधित रुग्ण चहा-पाणी व जेवणासाठी रुग्णालयातून बाहेर जात असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे.

कोविड सेंटरमधील पेशंटचे बाहेर जाऊन नाष्टा-पाणी, पाथर्डीकर धास्तावले

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी ः "तो' आला आणि हॉटेलमध्ये चहा पिऊन गेला. तेव्हापासून सर्वांनीच त्याचा धसका घेतला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर "त्या'ची चित्रफीतही व्हायरल करण्यात आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत. याची दखल घेऊन प्रशासनाने चौकशीचा आदेश दिला आहे. 

कोरोनाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. शेजारी उभी असलेली एखादी व्यक्ती शिंकली वा खोकली तरी आजूबाजूचे नागरिक त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहतात. अशातच आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर प्रत्येक जण पुढील काही दिवस आजारापेक्षा काळजीने खचून जातो. 

पाथर्डी शहरात कोरोनाबाधित रुग्ण चहा-पाणी व जेवणासाठी रुग्णालयातून बाहेर जात असल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे. अशाच एका वयोवृद्धाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वयोवृद्धावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात चहा न मिळाल्याने "त्या'ने बाहेर पडून हॉटेलमध्ये चहा घेतला.

कोरोनाबाधित रुग्ण चहा पिऊन गेल्याची चित्रफीत सोशलवर व्हायरल झाल्याने अनेकांनी धसका घेतला असून, शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून समाजमाध्यमावर प्रशासनाचे वाभाडे काढण्यात येत आहेत.

उपचार घेत असलेले रुग्ण रुग्णालयातून बाहेर जाऊनही यंत्रणेला याची माहिती मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 
या प्रकरणाची दखल प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी घेतली आहे. तहसीलदार श्‍याम वाडकर व पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांना त्यांनी, चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

रुग्णालयातील कोविड सेंटरच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी पोलिस निरीक्षकांकडे चार दिवसांपूर्वी केली आहे. कोविड सेंटरमधून रुग्ण बाहेर गेल्याबाबत चौकशी करू. 
- डॉ. अशोक कारळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी 

loading image