बिबट्याचा हल्ल्यात आठ वर्षाची चिमुकली जखमी, महिनाभरात तिसरी घटना

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 11 August 2020

महालक्ष्मीहिवरे (ता.नेवासे) येथील केदारवस्ती परीसरात घराच्या अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने झडप घातल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. एका महिन्यात ही तिसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. 

सोनई (नगर) : महालक्ष्मीहिवरे (ता.नेवासे) येथील केदारवस्ती परीसरात घराच्या अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने झडप घातल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. एका महिन्यात ही तिसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. 

सोमवार (ता.१०) रोजी सायंकाळी साडेसात वाजता अदिती गणेश टिकोणे ही घरासमोरील अंगणात खेळत असताना उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने झडप घातली तिच्या पाठीवर, मानेवर व डोक्याला पाच ते सहा खोलवर जखमा झाल्या. अदितीची आज्जी रंजना अशोक टिकोणे यांनी धाडस दाखवत बिबट्याचा जबड्यातून तीला सोडविले. घरातील इतरांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पुन्हा ऊसाच्या शेतात पळून गेला.

मागील महिन्यात बिबट्याने अभय रामराव शिरसाठ व मारुती सांगळे यांच्या मुलावर हल्ला केला होता. केदारवस्ती, दारकुंडेवस्ती, घुलेवस्ती व परीसरात तीन ते चार बिबटे असल्याचे बोलले जात आहे. परीसरात रोजच शेळ्या, मेंढ्या व कुत्रे मारले जात आहेत. हिवरे आणि माका परीसरात मोठी घबराट असून वन विभागाने किमान तीन पिंजरे लावावेत अशी मागणी सरपंच सिमोन जाधव व नाथा घुले यांनी केली आहे. 

महालक्ष्मीहिवरे ग्रामस्थ अदिनाथ सांगळे म्हणाले, परीसरात तीन ते चार बिबटे असल्याने सध्या शेतीचे कामे ठप्प झाली आहे. जनावरांना चारा आणायचा असेल तर घरातील बायकांबरोबर तीन-चार पुरुषांना हातात काठ्या घेवून जावे लागते.

संपादन - अशोक मुरूमकर 
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An eight year old girl from Mahalakshmihivare village was attacked by a leopard