
साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनीही मदतीचा हात दिला. एका अर्थाने या सर्वांनी या संकटकाळात आश्रमाचे पालकत्व स्विकारले.
शिर्डी ः साईभक्तीच्या प्रेरणेतून शंभराहून अधिक निराधार वृध्दांचा सांभाळ करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या येथील श्रीनिवासन यांना आठ दिवसांपूर्वी कोविड ने गाठले.
वृध्दाश्रमातील पंचवीस अधिक वृध्दांना संसर्ग झाला. श्रीनिवासन यांना तातडीने पुणे येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्या पश्चात कोविडच्या विळख्यात सापडलेल्या या वृध्दांना बाहेर काढण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रमोद म्हस्के व डाॅ.कुंदन गायकवाड यांच्यासह सरकारी यंत्रणेने पुढाकार घेतला.
साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनीही मदतीचा हात दिला. एका अर्थाने या सर्वांनी या संकटकाळात आश्रमाचे पालकत्व स्विकारले.
साईभक्तीच्या प्रेरणेतून आंध्र प्रदेशातील श्रीनिवासन व त्यांच्या पत्नी सुधा या सेवाभावी दांपत्याने वीस वर्षापूर्वी येथे वृध्दाश्रम सुरू केला. शिर्डी हे भाविकांनी सदैव गजबलेले देवस्थान आहे. घरात नकोसे झालेल्या वृध्दांना येथे आणून सोडल्याचा घटना नेहमी घडतात.
हेही वाचा - नवऱ्याने मारलं, पावसाने झोडपलं
कौटुंबिक आपत्तीमुळे अनेकदा वृध्द निराधार होतात. छत्र हरपलेल्या वृध्दांना श्रीनिवासन यांच्या वृध्दाश्रमामुळे हक्काचा आणि मायेचा निवारा मिळाला. या दांपत्यांचे सेवाकार्य पाहून दानशूर साईभक्तांनी वृध्दाश्रमासाठी तीन मजली सुसज्ज इमारत बांधून दिली. मनोरंजनासाठी मिनी थिएटरदेखील उपलब्ध करून दिले. साईसंस्थानने त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली.
निराधार वृध्दांवर मायेची पाखर घालणा-या श्रीनिवासन यांच्यावर हे संकट आल्याने शहरात त्यांच्या कार्याविषयी आस्था असलेली मित्रमंडळीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सरकारी यंत्रणा या निराधार वृध्दांच्या मदतीला धावल्याने या मित्रमंडळींनादेखील दिलासा मिळाला. आता सर्वांचे लक्ष या वृध्दाश्रमाकडे लागले आहे.
काही दिवसांपूर्वी तेथील एका वृध्देला पक्षाघाताचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला कोविडची बाधा झाली. रूग्णालयातून आश्रमात परत आल्यानंतर तेथे संसर्ग फैलावला. त्यात वीसहून अधिक वृध्दांसह श्रीनिवासन यांनाही संसर्ग झाला.
त्यांच्या कार्याची महती ठाऊक असल्याने पुण्यातील रूबी हाॅल रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. संजय पठारे यांनी त्यांना तातडीने त्या रूग्णालयात दाखल करून घेतले.
या सर्व वृध्दांची तपासणी करण्यात आली. लक्षणे असलेल्या वृध्दांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. आवश्यक त्या रूग्णांना कोविड उपचार केंद्रात हलविले. या वृध्दाश्रमातील शंभराहून अधिक निराधार वृध्दांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेने स्वीकारली. त्यातील कहीजण विकलांग आहेत. तर काहींना वृध्दापकाळातील आजाराने यापूर्वीच घेरले आहे. त्यांच्या संसर्गाचा आणखी फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले श्रीनिवासन यांची तब्येत उत्तम आहे.
साईबाबांच्या कृपेने व साईभक्तांच्या सहकार्याने आपण हे सेवाकार्य करतो. शिर्डीसह देशभरातील साईभक्तांनी या संकटासोबत मुकाबला करण्याची शक्ती आश्रमातील वृध्दांना मिळावी. यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या सदिच्छा व सरकारी यंत्रणेच्या मदतीमुळे आश्रम लवकरच या संकटातून बाहेर येईल.
- श्रीनिवासन रेड्डी, संचालक द्वारकामाई वृध्दाश्रम, शिर्डी.