पारनेर तालुक्यात निवडणुकीचे मतलबी वारे जोरात

मार्तंड बुचुडे
Thursday, 22 October 2020

कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्याने नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्याही प्रभागरचना व अद्ययावत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, तालुक्‍यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

पारनेर ः तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 88 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. तसेच, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पारनेर नगरपंचायतीची मुदतही नोव्हेंबरअखेर संपणार आहे.

कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतींसह अन्य निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्याने नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्याही प्रभागरचना व अद्ययावत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, तालुक्‍यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

पारनेर नगरपंचायत व तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने या वर्षी खऱ्या अर्थाने आमदार लंके व माजी आमदार औटी यांचा कस लागणार आहे. आपली लोकप्रियता कमी झाली नसून, पुढील निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा दावा करणाऱ्या लंके यांना आता आपला करिष्मा व वर्चस्व, तर माजी आमदार औटी यांना आजही तालुक्‍यात आपले अस्तित्व टिकून असल्याचे दाखवावे लागणार आहे.

पारनेर हे औटी यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे तेथे तर त्यांना आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहेच; मात्र आपल्या बालेकिल्ल्यात आमदार लंके यांना प्रवेश करण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान औटी यांच्यापुढे असेल. नगरपंचायत ताब्यात घेणार व शहराचा चेहरामोहरा बदलणार, असे वक्तव्य लंके यांनी नुकतेच केले आहे.

सध्या पारनेर पंचायत समितीत शिवसेनेचे गणेश शेळके सभापती आहेत. त्यामुळे पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार लंके यांना जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात येण्यासाठी तयारी करावी लागणार आहे, तर माजी आमदार औटी यांना पंचायत समिती पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी समजली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election atmosphere in Parner taluka