अतिक्रमणांनी ओढे-नाले केले गायब 

amc nagar
amc nagar

नगर : शहरात 30 वर्षांपूर्वी असलेले ओढे-नाले महापालिकेच्या गाव नकाशांतून गायब झाले आहेत. "गुगल'वर या नकाशाचे दर्शन घडत असले, तरी प्रत्यक्ष हे नकाशे दिसेनासे झाले आहेत. या ओढ्या-नाल्यांऐवजी फक्‍त उंच इमारती संसार थाटून उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. पावसाळ्यातील पहिल्याच मोठ्या पावसात या इमारतींच्या संसारांमध्ये पाणी येते आणि सुरू होतो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनासह सर्व विभागांचा सारवासारव करण्याचा खेळ... 

शहरीकरणामुळे सावेडी, बोल्हेगाव, नागापूर ही निसर्गरम्य खेडी उपनगरे होऊ लागली. शेतीचे प्लॉट झाले अन्‌ प्लॉटमधून कमाईचा नवा मार्ग सुरू झाला. यातून काहींनी अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून सुरवातीला ओढ्या-नाल्यांच्या गाळपेरात व नंतर ओढे-नाले व प्रसंगी सीना नदी, भिंगार नाल्यातही अतिक्रमणे केली. अधिकाऱ्यांनी या सावळ्या गोंधळाला कागदोपत्री सोज्वळ स्वरूप प्राप्त करून दिले. या प्रकाराचा अतिरेक होऊन अनेक ओढे-नाले गायब झाले. काही ठिकाणी या ओढ्या-नाल्यांना बंद, तर काही ठिकाणी अरुंद गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दर पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून ओढे-नाले सफाईचा फार्स होतो. गुगल व शहरातील जुन्या नकाशांमध्ये दिसणारे ओढे-नाले महापालिकेच्या शहर नकाशात मात्र दिसत नाहीत. 

येथे झाली अतिक्रमणे 
सारडा महाविद्यालयाशेजारी : महाविद्यालयाची भिंत व शेजारी असलेल्या हॉटेलची भिंत, तसेच टाकण्यात आलेल्या भरावामुळे ओढा अरुंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला भिंत घालून ओढ्याचे पात्र अरुंद करत त्याला गटाराचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या ओढ्यांत झाडे-झुडपेही वाढलेली आहेत. 

ओबेरॉय हॉटेलजवळ : फरशांचे तुकडे, माती आदींचा भराव घालत ओढ्यांचे पात्र अरुंद करत ते वळविण्यात आले आहे. ऑबेरॉय हॉटेलच्या समोरील बाजूला ओढ्यात भिंत घालून इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. 

पंचशील हॉटेलसमोर : पंचशील हॉटेलजवळून वाहत आलेल्या ओढ्याला बंद गटाराचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या बंद गटार झालेल्या ओढ्याला खेटून इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारती म्हणजे रहिवासी व व्यापारी संकुले आहेत. 

हडको वसाहत, रासनेनगरमधील ओढा : ओढ्यातच भिंत घालून ओढ्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या नाल्यावरून ये-जा करण्यासाठी पूलही करण्यात आलेला आहे. 

महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम परवाने देण्यात आले आहेत. यातच नालेसफाईचे काम झाले नाही. दोन-चार दिवस झालेला पाऊस मुसळधार होता; मात्र ढगफुटी झाल्यास गुलमोहर रस्ता परिसर पावसात वाहून जाईल. 
- शशिकांत चंगेडिया, अध्यक्ष, नागरिक कृती मंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com