esakal | हंगा नदीतून बेसुमार वाळूउपसा, दिवस-रात्र नदीची चाळण

बोलून बातमी शोधा

वाळू उपसा

हंगा नदीतून बेसुमार वाळूउपसा, दिवस-रात्र नदीची चाळण

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्‍यातील रांजणगाव मशीद हद्दीतील हंगा नदीत अनेक दिवसांपासून बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. कोरोनाच्या संकटातही वाळूतस्करांचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमाचा भंग करून येथील वाळूतस्कर तालुक्‍यात राजरोसपणे वाळूउपसा करीत आहेत. कोणालाही न जुमानता दिवसरात्र वाळूउपसा सुरू असून, या वाळूतस्करांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अनेक वर्षांपासून जिवापाड जपलेला वाळूसाठा आता "लॉकडाउन'मध्ये उपसण्याचे काम सुरू आहे. सर्वत्र "लॉकडाउन' असताना येथे मात्र बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. अवैध वाळूवाहतुकीचा हा खेळ रात्री चालतो.

रांजणगाव मशीद परिसरात हंगा नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात रुंदावत आहे. एकट्या रांजणगाव मशीद हद्दीत नदीची लांबी तीन किलोमीटर आहे. ही नदी हंगे, मुंगशी, वाघुंडे, रुई छत्रपती व पुढे श्रीगोंदे हद्दीतील चांभुर्डी परिसरातून वाहते. हंगे, मुंगशी, रुई छत्रपती व चांभुर्डी या परिसराच्या हद्दीतील वाळू यापूर्वीच अनधिकृतपणे चोरली गेली आहे.

"लॉकडाउन'ची संधी साधत, महसूल तसेच पोलिसांच्या सहकार्याने येथे रात्रभर वाळूउपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जीवनावश्‍यक वस्तूंचीही दुकाने बंद आहेत; मात्र रांजणगाव मशीद हद्दीत वाळूउपशात खंड नाही.

गावात एखादे दुकान उघडे दिसले किंवा बाजारात एखादा शेतकरी भाजी घेऊन आला, तर त्याला तत्काळ दंड केला जातो. मात्र, वाळूतस्करांना कोणीही अडवत नाही. वाळूतस्करांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. लोकांनी वाळूउपशाविरोधात संघटित होऊन एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे.

यापूर्वीही ग्रामपंचायत सदस्य होतो व आताही आहे. गावाच्या हद्दीतून वाळूउपसा कधीही होऊ दिला नाही. फक्त मीच वाळू वाहतूकदारांशी दुश्‍मनी घेत आहे. वाळूउपशामुळे येथील विहिरींना पाणी कमी पडेल. नदीशेजारील जमिनींचे नुकसान होईल. वाळूउपसा बंद झाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.

- महेश ऊर्फ काकासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य