esakal | बापरे, अडीच कोटींचा बनावट धनादेश वटवणारी टोळी पकडली

बोलून बातमी शोधा

CRIME
बापरे! अडीच कोटींचा बनावट चेक वटवण्याचा प्रयत्न
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः देशातील वेगवेगळ्या फर्म, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के, बनावट धनादेश तयार करून बनावट स्वाक्षऱ्यांच्या साह्याने बॅंकेत वटविणारी टोळी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल जेरबंद केली. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली. विपूल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर, राहुल गुळवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी सात जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिस नाईक रविकिरण सोनटक्के यांनी फिर्याद दिली आहे. विपूल नरेश वक्कानी (वय 40), यशवंत दत्तात्रेय देसाई (वय 49), नरेश रामचंद्र बालकोंडेकर (वय 33), राहुल ज्ञानोबा गुळवे (वय 46), संदीप भगत, तुषार आत्मराम कुंभारे (सर्व रा. पुणे) व विजेंद्र दक्ष (रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

वक्कानी, देसाई, बालकोंडेकर, गुळवे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन कार, बनावट शिक्के, चेकबुक, मोबाईल, असा 20 लाख 95 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलच्या नावे अडीच कोटी रुपयांचा एक धनादेश वक्कानी, देसाई, बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बॅंकेच्या शाखेत आले. त्यांनी बॅंकेत धनादेश वटविण्यासाठी दिला. शाखा व्यवस्थापकांना शंका आली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांना संपर्क करून माहिती दिली.

निरीक्षक घुगे व त्यांचे पथक तत्काळ बॅंकेत गेले. त्यांनी याबाबत दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलकडे पोलिसांनी व बॅंक व्यवस्थापकांनी चौकशी केली असता, आम्ही असा कोणताही धनादेश दिला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे बनावट धनादेशाचा प्रकार उघडकीस आला. आरोपींकडे चौकशी केली असता हा धनादेश राहुल गुळवे व संदीप भगत यांनी दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी पुणे येथून राहुल गुळवे याला अटक केली. गुळवे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता दिल्ली येथील विजेंद्र दक्ष याने धनादेश दिल्याचे समोर आले. यापूर्वी दोन वेगवेगळ्या बॅंकांमध्ये बनावट धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याचे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले.