नेवाशात शेतकऱ्याने ऊस पेटवला, आता राजकारणही पेटले

विनायक दरंदले
Saturday, 20 February 2021

शेती मालक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो मुळा कारखान्याचा सभासद नाही. त्याने उस लागवडीची नोंद दिलेली नाही.

सोनई (अहमदनगर) : करजगाव येथील शेतकऱ्याने मुळा कारखाना तोड देत नसल्याने अडीच एकर उसपीकाला काडी लावत तो पेटवून दिला. यानंतर येथील राजकारणही चांगलेच पेटले. त्यावरून सोशल मीडियावर आरोपांचे गु-हाळ रंगले आहे.

दोन दिवसांपूर्वी करजगाव परिसरात अशोक टेमक यांनी अडीच एकर उसाला तोड भेटत नसल्याच्या कारणावरून उभे पीक पेटवून दिले. हनुमानवाडी येथील ॠषीकेश शेटे यांनी 'शेतक-यांच्या मरणाचा सोहळा' या नावाखाली फेसबुकवर मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाला आमंत्रित करीत उस पेटविण्याचा जाहीर कार्यक्रम दाखविला. सत्ताधारी गटाच्या युवकांनी विरोधकांवर स्टंटबाजीचा आरोप करीत ही तर गोड उसाची कडू कहाणी जाणीवपूर्वक रचण्यात आल्याचा आरोप केला. 

हेही वाचा - पत्नीसह दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरचीही आत्महत्या

उसातोडीवरून आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अडीच एकरपैकी दोन एकर उसाला भरपूर पाणी देवून केवळ वीस गुंठे उसाचे पीक जाळण्यात आले, असे करजगाव भागातील सभासद सांगत आहेत.

शेती मालक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो मुळा कारखान्याचा सभासद नाही. त्याने उस लागवडीची नोंद दिलेली नाही. तलाठ्याने जळीताचा रितसर पंचनामा केला, तर सत्य बाहेर येईल, अशी टिप्पणी करीत सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांचा कलगी-तुरा रंगला आहे.

व्यवस्थापनाने नियमानुसारच उसाची तोड करावी.स्टंटबाजी व दबावतंत्र पाहून मध्येच कुणाला तोड दिली तर आम्ही देखील आमचे उसाचे पीक पेटून देवू.असा सूर इतर सभासदांतून व्यक्त होत आहे. सर्व घडामोडीवर लक्ष ठेवत 'मुळा' चा शेतकी विभाग सध्या तरी पूर्व नियोजन व नियमानुसार कामकाज करीत असल्याचे दिसते.

 

ग्रामपंचायत निवडणूक विरोधात लढविल्याने जाणीवपूर्वक आमच्या उसाला तोड दिली जात नाही. या प्रकाराची संबंधितांनी नोंद घ्यावी. अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल. 
- ॠषीकेश शेटे, शेतकरी हनुमानवाडी.

उत्कृष्ट व्यवस्थापनाचा दोन वेळेस पुरस्कार मिळालेल्या व मागील महिन्यात संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झालेल्या मुळा कारखान्यावर होत असलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. भरपूर उसाचे क्षेत्र असल्याने सर्वांनाच तोडीसाठी थांबावे लागते आहे. येथील नियोजन व कारभार पारदर्शी आहे.
- बापूसाहेब बारगळ, सभासद सोनई

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली 'मुळा'चा कारभार सर्व सभासद व शेतकरी हिताचा आहे. चुकीची माहिती पुढे करीत काही विरोधक कारखान्याची बदनामी करीत नेहमीप्रमाणे दवंडी देत आहेत. उस पेटवून केलेली नौटंकी सभासद शेतकरी जाणून आहेत. दबावाला न घाबरता नोंद असलेल्या सर्व उसाची तोड केली जाईल.
- नानासाहेब तुवर, अध्यक्ष, मुळा कारखाना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer set the cane on fire