esakal | विमा कंपनीने लावली वाट, कपाशी उत्पादकांना दाखवला कात्रज घाट
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers in Pathardi did not get crop insurance

गेल्यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

विमा कंपनीने लावली वाट, कपाशी उत्पादकांना दाखवला कात्रज घाट

sakal_logo
By
राजेंद्र सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यात गेल्यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. निसर्गाचा लहरीपणा व पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे होणाऱ्या नुकसानीचा आलेला अनुभव असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात पिकांना विमा कवच मिळावे, यासाठी मोठ्या प्रमाणात विमाकंपनीकडे विम्याची रक्कम विमा भरली होती. झालेल्या नुकसानभरपाईचे पैसे आज ना उद्या मिळतील या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना संबंधित विमाकंपनीने कात्रज घाट दाखवला आहे.

हेही वाचा :  सात- बारा, आठ अ मधील दुरुस्ती करण्याची युवक काँग्रेसची मागणी
तालुक्यातील सहा महसूल मंडलापैकी, मिरी मंडल वगळता अन्य पाच मंडलांना कपाशी पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. तालुक्यात टाकळीमानूर, माणिकदौंडी, करंजी, पाथर्डी, कोरडगावं, मिरी अशी सहा महसूल मंडल आहेत. मागील वर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. तालुक्यात १० हजार 924 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक घेण्यात आले होते. कपाशी वेचणीवेळी अवेळी झालेल्या पावसाने, अतिवृष्टीमुळे पांढरे सोने काळवंडले होते. झालेल्या मुसळधार पावसाच्या सरीने बोंडातील कापूस जमिनीवर गळाला होता. परिणामी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला होता. दोन वर्षांपूर्वी बोंडअळीनेही कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तो अनुभव लक्षात घेऊन मागील वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम अदा करत विमा काढला होता.

शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल या आशेने पैशाची जुळवाजुळव करुन विमा रक्कम भरली होती. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी बँक पासबुक हातात घेऊन बँकेत विम्याची रक्कम जमा होईल. या भाबड्या आशेने अनेक चकरा मारल्या होत्या. पीक विम्याची यादी जाहीर होताच पाच मंडल वगळण्यात आल्याने 'त्या' मंडलातील संबंधित शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवण्यात सुरवात केली आहे. यातील केवळ मिरी मंडल विमा कंपनीच्या निकषात बसल्याने दोन हजार 569 शेतकऱ्यांना एक कोटी 51 लाख 44 हजार विमा मिळाला असून अन्य पाच मंडलांना विम्यातून वगळण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय आयुर्विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक विनायक पवळे म्हणाले, कृषि विभागाने पाथर्डी तालुक्यातील उंबरठा उत्पन्नाचा जो अहवाल मुंबईला पाठविला त्यावरुन व निकषामधे बसणा-या मंडळामधे विमा मंजुर होतो. मंजुरीचे अधिकार जिल्हा पातळीवर नसतात. तसेच विमा मिळावा यासाठीचे निकष मला सांगता येणाकर नाहीत.

तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर म्हणाले, तालुक्यातील सहा पैकी पाच महसूल मंडल विम्यातून वगळण्यात आले आहेत. याबाबत संबंधित कंपनीशी संपर्क साधणार आहे. कोणत्या निकषांवर विमा नाकारण्यात आला याची मीहीती घेतली जाईल.

असा भरला होता शेतक-यांनी पिकविमा 
टाकळीमानूर मंडलातील आठ हजार 989 शेतकऱ्यांनी 74 लाख, पाथर्डी मंडलात एक हजार 682 शेतकऱ्यांनी 18 लाख, माणिकदौंडी मंडलात चार हजार 674 शेतकऱ्यांनी 42 लाख, कोरडगाव मंडलातील दोन हजार 296 शेतकऱ्यांनी 31 लाख, करंजी मंडलात एक हजार 392 शेतकऱ्यांनी 16 लाख तर मिरी मंडलातील दोन हजार 569 शेतकऱ्यांनी 30 लाख असे एकूण एकवीस हजार 622 शेतकऱ्यांनी सुमारे दोन कोटी 11 रुपये विमा कंपनीला अदा केले होते.

संपादन : अशोक मुरुमकर