मुंबईचे जावई पारनेरकरांसाठी ठहताहेत दशमग्रह, पॉझिटिव्ह निघाल्याने पुन्हा पंचाईत

Fear in villages due to Mumbaikars
Fear in villages due to Mumbaikars

पारनेर : जुन्या काळी मुंबईचे स्थळ म्हणजे मुलींच्या वडिलांना आकाश ठेंगणं व्हायचं. ते महाशय आपल्या जावयाची कथा गावागावांत सांगायचे. मुंबईचा जावई म्हणजे त्यांचा रूबाबही भारी असायचा. सासुरवाडीला आल्यावर त्याचा थाट काही विचारू नका...पण आता मुंबईचा जावई म्हणलं की लोकांच्या काळजात धडकी भरते. आणि सासरेबुवाचीही गावात पंचाईत होतेय. पुणे, मुंबईचे जावई गावागावांत व्हिलन ठरू लागले आहेत. कोरोनाने हा बदल घडून आणला आहे.  

तालुक्यातील एका गावात जावयाने कोरोनाचा कहर केल्याची घटना ताजी असतानाच आज (ता. 25 ) त्याची एका गावात पुनरावृत्ती झाली. 19 मे रोजी मुंबईहून बायको मुलांसह आलेला जावई पॉझिटीव्ह निघाल्याने पुन्हा एकदा जावयानेच  तालुक्यात कोरोनाचा वानोळा आणल्याची चर्चा आहे. परिणामी पारनेरकरांची धाकधूक पुन्हा वाढली अाहे. पुढील आदेशापर्यंत गाव बंदचा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे.

तालुका गेली अनेक दिवसांपासून कोरोना मुक्त होता. मात्र, मुंबईहून एक जावई तालुक्यात दाखल झाला त्याला त्रास होऊ लागल्यानंतर नगर येथे दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्याचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू नंतरचा अहवाल  पॉझिटीव्ह आला होता. 

ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील दुसरीही घटना तशीच घडली आहे. म्हसणे येथील जावई असलेला व मुंबई(घाटकोपर) येथून पत्नी व मुलांसह 19 मे रोजी म्हसणे येथे आला होता. त्या जावयास  तीन दिवसांपूर्वी (ता. 23 ) त्रास होऊ लागल्याने त्यास नगर येथे जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा स्त्रावही घेण्यात आला होता. परंतु त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यात भितीचे सावट पसरले आहे.

हे जावईबापूही मुंबईचेच

विशेष म्हणजे हा जावईसुद्धा मुंबई येथूनच आला होता. मात्र, त्यास कोरंटाईन केलेले असल्याने त्याचा फारसा कोणाशी संबध आला नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे सांगतात. तरीही त्याच्या संपर्कत कोणकोण आले असावे, तो कोणत्या गाडीने आला, कोठे थांबला, कोठे गेला होता.  याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सध्या त्याची पत्नी व मुलगा यांना नगर येथे तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, तहसीलदार देवरे यांनी म्हसणे गावात जाऊन संबधित कुटुंबाची माहिती घेतली. पुढील आदेश येईपर्यंत गाव बंद करण्याचे जाहीर केले. 

अहवाल उशिरा आला..

संबधित व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल त्याच दिवशी येणे अपेक्षित होते. मात्र, तो थेट तिसऱ्या दिवशी आला. त्यामुळे या तीन दिवसांत त्याचा आणखी कोणाशी संपर्क आला का, याची यादी वाढण्याची शक्यता आहे.  तपासणी अहवालातील दिरंगाई ही सुद्धा त्याच्या संपर्कातील लोकांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com