शिर्डी नगर पंचायतीत नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी

सतीश वैजापूरकर
Thursday, 29 October 2020

निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी गटात दोन गट पडले, तर या एकूण सात सदस्यांच्या मतांना महत्त्व येऊ शकते. हे लक्षात घेऊन नवी राजकीय समीकरणे तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिर्डी ः नगरपंचायतीत सत्ताधारी असलेल्या विखे गटाच्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांना ठरवून दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला. त्यामुळे नव्या नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेवक जगन्नाथ गोंदकर यांचे नाव चर्चेत आहे. तथापि, निवड सर्वानुमते होते, की त्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ येते, यावर बरेच काही अवलंबून आहे. 

निवडणूक घेण्याची वेळ आली, तर काय भूमिका घ्यायची, याबाबत नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठका जोरात सुरू आहेत. मूळ भाजपचे तीन व शिवसेनेचा एक, असे चार सदस्य वगळता, उर्वरित 13 सदस्य विखे गटाचे आहेत. अर्थात, त्यात मनसेसह तीन अपक्षही आहेत. या सर्वांचे अंतर्गत हितसंबंध आहेत.

निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी गटात दोन गट पडले, तर या एकूण सात सदस्यांच्या मतांना महत्त्व येऊ शकते. हे लक्षात घेऊन नवी राजकीय समीकरणे तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विखे गटाने एकसंध राहून नगराध्यक्ष निवडला, तर जगन्नाथ गोंदकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, निवडणूक झाली तर चुरस अटळ आहे. 

नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी लवकर राजीनामा देण्याचे संकेत श्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. मात्र, नव्या नगराध्यक्ष निवडीबाबत सत्ताधारी गटातील नगरसेवकांना कुठल्याही सूचना केलेल्या नाहीत. त्यांची मतेही जाणून घेतलेली नाहीत. असे असताना, गेल्या चार ते पाच दिवसांपासून गाठीभेटी व बैठकांना जोर आला आहे.

निवडणूक झाली तर काय भूमिका घ्यायची, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरपंचायत निवडणूक जवळ आल्याने या पदाला आणखी महत्त्व आले आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात, याकडे सत्ताधारी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fielding for the post of Mayor in Shirdi Nagar Panchayat