पाथर्डीत पन्नास कोंबड्या दगावल्या, यंत्रणा झाली अलर्ट, तपासणीपूर्वीच चिकनने खाल्ली आपटी

दौलत झावरे
Monday, 11 January 2021

जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत.

नगर ः जिल्ह्यात मागील वर्षभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला होता. आता बर्ड फ्लूचे संकट पोल्ट्री उत्पादकांवर घोंगावू लागले आहे. पाथर्डी तालुक्‍यात 50 कोंबड्या तसेच श्रीगोंदे शहरात एक कबूतर व भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे एक कावळा दगावल्याचे आढळून आले. 

जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. तेथील रिपोर्ट आल्यानंतरच बर्ड फ्लू की आणखी काही हे समजू शकेल, असे जिल्हा परिषदेचे डॉ. सुनील तुंभारे यांनी सांगितले.

हेही वाचा - शेवटच्या मंगलाष्टकापूर्वीच नवरदेव कोसळला

मागील वर्षात मार्च ते जून दरम्यान चिकन व मटन खाल्याने कोरोना होत असल्याची अवई उठली होती. या आवईचा सर्वाधिक फटका पोल्ट्री उत्पादकांना बसलेला होता. त्यानंतर प्रशासनासह पशुसंवर्धन विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतल्यामुळे परिस्थिती हळूहळू सुधारत गेली.

कोरोनात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिकन, मटन व अंडे खाण्यास नागरिकांनी सुरवात केली. त्यामुळे चिकनसह अंड्याच्या भावांनी तेजी घेतलेली होती. परंतु आता बर्ड फ्लूचे संकट पोल्ट्री व्यवसायावर घोंगावू लागले. त्यामुळे चिकनसह अंड्याच्या भावात कमालीची घसरण सुरू झाली आहे. अद्याप बर्ड फ्लूने जिल्ह्यात शिरकाव केलेला नसला तरी त्याचा परिणाम दिसू लागला आहे. 

पाथर्डी तालुक्‍यात 50 कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. श्रीगोंदे शहरात एक कबूतर व भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे एक कावळा मृत आढळला. या सर्व पक्षांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. लॅबचा अहवाल आल्यानंतरच हे पक्षी बर्ड फ्लूने मृत्यूमुखी पडले की इतर कशाने हे स्पष्ट होणार आहे. 
 
चिकनसह अंड्याच्या भावात घसरण 
राज्यासह देशात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्लूने आलेला नसला तरी त्याचे परिणाम दिसू लागलेत. चिकन व अंड्याच्या भावात घसरण झाली आहे. 180 किलो दराने चिकन व प्रति नगर सहा ते सात रुपये भावाने विक्री होणाऱ्या अंड्याच्या भावात घसरण झाली. चिकन 100 तर प्रति अंडे चार रुपयांना विक्री होऊ लागले. काही ठिकाणी अजूनही दर टिकून आहेत.
 
जिल्ह्यातील पक्षांची आकडेवारी 

  • पोल्ट्रीची संख्या ः 3341 
  • बॉयलर पक्षी संख्या ः एक कोटी 14 लाख 
  • अंडी देणारे पक्षी ः 76 हजार 
  • परसातील कोंबड्या ः 89 लाख 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty hens were slaughtered in Pathardi, the government system was alerted