
कर्डिले म्हणाले, 'तालुक्यात 19 हजार 853 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल खात्याने केले. परंतु, अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी सप्टेंबर महिन्यात एकाच दिवसात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे.
राहुरी (अहमदनगर) : तालुक्यात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु, शासनाच्या पर्जन्यविषयक चुकीच्या निकषामुळे तालुक्यातील सात पैकी एकाच महसूल मंडळातील शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पात्र ठरले. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सरसकट सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी. मका खरेदी केंद्र सुरु करावे. अन्यथा येत्या आठ दिवसात भाजपातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला.
गुरुवारी सायंकाळी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्डिले बोलत होते. भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, शहाजी ठाकूर, सोपान गागरे, गणेश खैरे, आदित्य दहीफळे, नामदेव कांबळे उपस्थित होते.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कर्डिले म्हणाले, 'तालुक्यात 19 हजार 853 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झाल्याचे पंचनामे महसूल खात्याने केले. परंतु, अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी सप्टेंबर महिन्यात एकाच दिवसात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे, असा निकष शासनाने लावला. त्यात, तालुक्यातील सात पैकी फक्त राहुरी महसूल मंडळातील 2400 हेक्टर क्षेत्र पात्र ठरले. वास्तविक, तालुक्यात यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे उभी पिके पाण्यात सडली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.'
भाजप सरकारच्या काळात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मागितली होती. सत्तेवर आल्यावर त्यांना विसर पडला. हेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. त्यात, हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम पाठवली. विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपाला साथ दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे, शेतकऱ्यांना मदतीचा हात आखडता घेतला आहे.
सरसकट नुकसान भरपाई मिळावी. आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई रक्कम जमा करावी. शासकीय मका खरेदी केंद्र सुरु करावे. अन्यथा प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्डिले यांनी दिला.
संपादन - सुस्मिता वडतिले