
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री महाजन यांनी शनिवारी दुसऱ्यांदा राळेगणसिद्धीत त्यांची भेट घेतली. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे उपस्थित होते.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कोरोनाने १०-११ महिने सर्वच मंत्रालयातील कामकाज बंद होते. कोरोना आता जवळपास संपत आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घातले आहे. त्या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, अशी माहिती राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर माजी मंत्री महाजन यांनी शनिवारी दुसऱ्यांदा राळेगणसिद्धीत त्यांची भेट घेतली. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीच्या बैठकीसाठी नगरला आलो होतो. पुण्याला जाताना अण्णांची भेट घेतली. अण्णांच्या मागण्या या 2018-2019 च्या आंदोलनातील आहेत. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा, यासाठी केंद्राने उच्चाधिकार समिती नेमावी, या प्रमुख मागण्या आहेत. त्यासंदर्भात दुसऱ्यांदा चर्चा झाली. अण्णांच्या मागण्या शेतकरीहिताच्या असून, त्याबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यात लक्ष घातले आहे. लवकरच सकारात्मक तोडगा निघेल, असे महाजन म्हणाले.
अण्णा उपोषणावर ठाम
माजी मंत्री गिरीश महाजन व खासदार डॉ. सुजय विखे चर्चेसाठी आले होते. या चर्चेवर मी समाधानी नाही. केंद्र सरकारकडे ते चर्चेची माहिती पोचविणार आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनप्रश्नी लवकरात लवकर योग्य कार्यवाही झाली नाही, तर उपोषणावर आपण ठाम आहोत.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक