राहुरीत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह चौघे कोरोना पॉझिटिव्ह

विलास कुलकर्णी
Friday, 25 September 2020

राहुरी पोलिस ठाण्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह चारजण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळले.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी पोलिस ठाण्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह चारजण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळले. आता, पोलिस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणीची गरज आहे. कैद्यांपोठोपाठ पोलिसांमध्ये कोरोना बॉम्ब फुटेल. अशी भीती पोलिस वर्तुळात व्यक्त होत आहे.

राहुरीच्या कारागृहातील 37 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापाठोपाठ आठ- दहा दिवसात कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी आजारी पडू लागले. चार दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले. मागील दोन दिवसात आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. सध्या बारा जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. राहुल पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या होणे गरजेचे आहे. अन्यथा, एखाद्या कर्मचार्‍याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे. 

कोरोना तपासणी केली. तर, कैद्यांपोठोपाठ पोलिसांमध्ये कोरोना बॉम्ब फुटेल. वरिष्ठांची नाराजी ओढावेल. या भीतीने पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देऊनही, वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी करीत नाहीत. असा सूर पोलिस वर्तुळात उमटू लागला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four corona positive with a senior police officer in Rahuri