
गुप्त खबरीवरून कोल्हार फाट्याच्या अलीकडे पोलिसांनी सापळा रचला. त्यांना एका पिकअपच्या आडोशाला सात जण संशयितरित्या उभे असल्याचे दिसले.
राहुरी : नगर-मनमाड रस्त्यावर गुहा पाटाजवळ काल (सोमवारी) रात्री साडेसात वाजता दरोड्याच्या तयारीतील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेऊन तिघे पसार झाले. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली.
गणेश बाळासाहेब शेंडगे (वय 21), किरण ऊर्फ विकी बबन थोरात (वय 25, दोघेही रा. चिंचोली फाटा), आकाश बाबासाहेब वाकडे (वय 22, रा. गुहा पाट), नवनाथ नंदकुमार पाचारणे (वय 20, रा. डिग्रस) अशी आरोपींची नावे आहेत. शेंडगे याच्यावर पाच, थोरात याच्यावर तीन, तर वाकडे याच्याविरुद्ध दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
पसार आरोपींमध्ये अभी अशोक जाधव (रा. कोल्हार खुर्द), प्रकाश भोसले (रा. चिंचोली फाटा) व अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
हेही वाचा - एकदाच लागवड करा, मग पैसाच पैसा
गुप्त खबरीवरून कोल्हार फाट्याच्या अलीकडे पोलिसांनी सापळा रचला. त्यांना एका पिकअपच्या आडोशाला सात जण संशयितरित्या उभे असल्याचे दिसले. त्यांच्या हालचाली पाहून पथकाने शिताफीने चौघांना ताब्यात घेतले. मात्र, अंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले. आरोपींकडून मालवाहू गाडी (एमएच 17 बीटी 4533), दरोड्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
नगरमध्येही पकडली टोळी
नगर शहरातील कांदा मार्केट रस्ता परिसरात दरोड्याच्या तयारीतील तिघांची टोळी कोतवाली पोलिसांनी पकडली. त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, मिरची पावडर, दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
केडगाव परिसरात काही तरुण दुचाकीवर फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार यांनी केडगाव परिसरातील बाजार समिती रस्त्यावर सापळा रचला असता, त्यांना काही तरुण दुचाकीवर फिरताना आढळून आले.
पोलिसांनी एका दुचाकीस्वार थांबण्याचा इशारा केला असता, दुचाकीवरून उड्या टाकून त्यांनी पळ काढला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन, त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, मिरची पावडर, दुचाकी आदी साहित्य जप्त केले.
आरोपी नितीन किसन पवार याच्याविरुद्ध कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. पोलिस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर