सरपंचपदासाठी फोडाफोडी ः पारनेरमध्ये सदस्यांना झाले लक्ष्मीदर्शन आता निघाले देवदर्शनाला

मार्तंड बुचुडे
Monday, 1 February 2021

तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षणाप्रमाणे सरपंचपदाची निवड लवकरच होणार असल्याने अनेकांचे लक्ष आता सरपंच निवडीकडे लागले आहे.

पारनेर ः शासन पद्धतीत लोकशाही ही सर्वात कमी दोष असलेली पद्धत आहे. त्यामुळे ती भारताने स्वीकारली आहे. निवडणुका हा लोकशाहीतील सण मानला जातो. मात्र, अलिकडे काही धनिक मंडळींनी त्याला घोडेबाजार बनवला आहे. संसदेपासून ग्रामसंदेपर्यंतचे सदस्य पैशाने विकत घेतले जात आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षणाप्रमाणे सरपंचपदाची निवड लवकरच होणार असल्याने अनेकांचे लक्ष आता सरपंच निवडीकडे लागले आहे. कोण होणार सरपंच  या चर्चेला गावगावात उधाण आले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना  मिळणार पाच हजार रूपये पेन्शन

सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. तरीसुद्धा ज्यांना बहुमत मिळाले आहे, ते  धोका नको म्हणून नवनिर्वाचित सदस्यांसह  सहलीला  रवाना झाले आहेत. काहींनी बहुमत नसताना सदस्यांना फोडून लक्ष्मीदर्शन देत देवदर्शनालाही नेले आहे. काही गावांतील सदस्य सहलीवर जाण्याच्या तयारीत आहेत.

तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्या पैकी  तालुक्यातील आमदार निलेश लंके यांच्या हंगे गावासह रांधे, शिरापूर, कारेगाव, पिंपरी पठार ,जाधव वाडी, भोयरे गांगर्डा, पळसपुर ,धोत्रे खुर्द अशा  तालुक्यातील नऊ  ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या.  तर जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगावदर्या या गावात एक किंवा दोन जागांवरच निवडणुका झाल्या.  

अाता सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे सरपंच कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काठावर बहुमत मिळालेल्या अनेक ग्रामपंचायती आहेत, तर एका जागेवरून बहुमत हुकलेले काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे एखादा दुसरा सदस्य फोडून आपल्या गटातील सदस्याला कसे सरपंच करता येईल याची व्यूहरचना सध्या तालुक्यात रात्रंदिवस सुरू आहे. अनेक गावात सध्या नेते मंडळी व नवनुर्वाचित सदस्याच्या जंगी पार्ट्या सुरू आहेत.

काही गावातील नेते मंडळीनी धोका नको म्हणून आपले सदस्य अताच  देवदर्शनाला पाठविले आहेत. सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्या बरोबर  काही गावातील सदस्य सहलीवर जाण्याची तयारीत आहेत. तसे नियोजनही करण्यात आले आहे. 

गटबदलाची तांत्रिक अडचण आहे का

तालुक्यात अनेक गावांत विविध गटांना काठावर बहुमत मिळाल्याने व सदस्यांना गटबदलात कोणतीही आडचण नसल्याने अनेक सदस्य आपल्या मर्जीप्रमाणे  गट बदल करू शकतात. त्यामुळे अनेक गावात सरपंच पदाची गणिते आयत्या वेळी बदलणार आहेत. काही गावांत अपक्ष  सदस्यही निवडून आल्याने सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच सदस्यांचा घोडा बाजार सुरू होणार असल्याने धोका नको म्हणून गावागावात सहलीचा फंडा काढला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat members went on a trip to Parner