श्रीगोंद्यात गुटखा-मावा, गुजरात-कर्नाटकातून येते रसद

संजय आ. काटे
Saturday, 29 August 2020

श्रीगोंद्यात येणारा गुटखा व सुगंधी पदार्थ हे गुजरात व कर्नाटक राज्यातून येत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपर्यंत गुटखा विक्रीचे अनधिकृत टेंडर केवळ ठराविक लोकांच्या हाती होते. मात्र गेल्या काही दिवसात पोलिस, अन्न भेसळ विभाग यांची दहशत राहिली नसल्याने आता या गोरखधंद्यात अनेक लोक उतरत आहेत.

श्रीगोंदे : सरकारने गुटखा, सुगंधी तंबाखु व तत्सम पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातल्याने शौकीनांच्या खिशाला कात्री लागत आहे. मात्र गुटखा व सुगंधी पदार्थांचा कोरोना लाॅकडाऊनमध्येही तुटवडा नाही.

शहरापासून गावातील दुकानांत सहज उपलब्ध होणारे हे पदार्थ गुजरात व कर्नाटक राज्यातून येत असल्याची माहिती आहे. ठराविक एजंट असणाऱ्या या धंद्यात आता भागीदार वाढलेत. तथापि या धंद्यात चांदी नेमकी कोणाची होते, जीव धोक्यात घालून गुटखा पोच करणाऱ्याला की त्याला संरक्षण देणाऱ्याची याचा मेळ लागत नसला तरी धंदा मात्र वाढला आहे.

अनेक वर्षांपासून बंदी असणारा हा गुटखा व सुगंधी पदार्थ सगळीकडे बिनधास्त दिसतात. तरुणांपासून वृध्दांपर्यंत अनेकजण कोरोनाची भिती बाजूला सारुन गुटख्याची पुडी तोंडात रिकामी करताना सार्वजनिक ठिकाणी आढळतात. यात यंत्रणेतील लोकही अपवाद नाहीत. सार्वजनिक ठिकाणचे कोपरे गुटख्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले असल्याने गुटखा किती सर्वमान्य आहे याची साक्ष मिळते. 

हेही वाचा - नगरच्या चिमुरडीमुळे व्हाईट हाऊस अवाक

श्रीगोंद्यात येणारा गुटखा व सुगंधी पदार्थ हे गुजरात व कर्नाटक राज्यातून येत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपर्यंत गुटखा विक्रीचे अनधिकृत टेंडर केवळ ठराविक लोकांच्या हाती होते. मात्र गेल्या काही दिवसात पोलिस, अन्न भेसळ विभाग यांची दहशत राहिली नसल्याने आता या गोरखधंद्यात अनेक लोक उतरत आहेत.

शहरातच चार ते पाच जण होलसेल गुटखा आणून इच्छितस्थळी पोच करतात. या लोकांचे काष्टी, बेलवंडी याभागात पंटर असून दौंड व शिरुर सरहद्दीपर्यंतच्या गावात गुटखा पोच करण्याचे काम ते करतात. विशेष म्हणजे पहाटे, दुपारी, संध्याकाळी व रात्री कधीही गुटखा मागितला तरी तो पोच होत असल्याने या प्रशासनाची किती मदत आहे याची प्रचिती मिळते. 

हिरा नावाचा गुटख्याची बॅग 1900 रुपयांना मिळते. त्यात 106 पुडे असतात. विमल सुगंधी- बॅग किंमत 9500 रुपये, 54 पुडे येतात. 60 पाऊच असणारा माणिकचंद गुटका पुडा 850 रुपयांना मिळतो. या सगळ्यांची किरकोळ विक्री दहा रुपयांपासून ते तीस रुपये पुडी अशी आहे. 

पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. मात्र या कारवाईनंतरही विक्री कमी होण्याऐवजी वाढत असल्याने यात नेमका माल कोणाला मिळतो हा कळीचा मुद्दा आहे. पोलिसांची अथवा अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाची दहशत का नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आता कारवाईचे अधिकार थेट पोलिसांना असले तरी गुटखा बंद होत नाही. 

पन्नास रूपयांना तीन पुड्या
कोरोना संकटात श्रीगोंदे शहरात व प्रमुख गावात ठराविक कंपनीचे व जास्त मागणी असणाऱ्या गुटखा पुडी विक्रीची स्किम सुरु आहे. पन्नास रुपयांच्या तीन पुड्या अशी ही योजना असून इतर ठिकाणी एका पुडीला वीस रुपये मोजावे लागत असल्याने तीन पुड्यात दहा रुपयांचा फायदा होत असल्याने स्किम सुरु असणाऱ्या ठिकाणी शौकीनांची गर्दी होत असते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha-Mawa in Shrigonda is supplied from Gujarat-Karnataka