अकोले : तालुक्यातील रंधा, माळेगाव, मान्हेरे, वाकी, वारंघुशी, बारी, पांजरे परिसरात आज (बुधवारी) सायंकाळी चारच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांसह आंब्याला फटका बसला आहे. भंडारदरा येथे सत्तर मिनिटांत ४७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. वादळी वारा व पावसाने भंडारदरा येथील भगवान भांगरे यांच्या एकवीरा हॉटेलचे सर्व पत्रे उडाले, तर वाकी परिसरातील मारुती मोरे यांच्या वीटभट्टीचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
पांजरे येथील कांदा, टोमॅटो पिकांसह आंब्याचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे खांबही भुईसपाट झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा गायब झाला. भंडारदरा पाणलोट क्षेत्र जलमय झाले. नाले, ओहळ वाहताना दिसले. सोसाट्याचा वारा व त्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली. राजूर, कोतूळ, अकोले, समशेरपूरला पावसाने चांगलेच झोडपले. वारंघुशी येथील शेतकरी भरत घाणे यांनी शेतात काढून ठेवलेला गहू, हरभरा, कांदा भिजला, तसेच जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले. घराच्या भिंती, पत्रे यांचेही नुकसान झाले.
गारांच्या माऱ्यातून दाम्पत्य बचावले
भंडारदरा येथून मारुती घिगे पत्नीसह दुचाकीवरून मेचेकरवाडी येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. ते गुहिरे येथे आले असता गारांचा पाऊस सुरू झाला. गारांच्या माऱ्याने घिगे दाम्पत्य जखमी झाले. थंडीमुळे ते गारठून गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.