
सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत ग्रामीण भागातील रुग्णांना व ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व उपचार करून या आजारावर यशस्वी लढा देण्याचे काम केले.
शेवगाव (अहमदनगर) : कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न करीत ग्रामीण भागातील रुग्णांना व ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व उपचार करून या आजारावर यशस्वी लढा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग तपासणीचे मशीनचे घुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पोटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे, गटविकास अधिकारी डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा इराणी, पंचायत समिती सदस्य मनिषा कोळगे, भास्कर शिंदे आदी उपस्थित होते.
घुले म्हणाल्या की, क्षयरोग या संसर्गजन्य आजाराचे निदान होण्यासाठी संगणकीय मशीनचे जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हास्तरावर येण्याची गरज भासणार नाही. सदर मशीनद्वारे क्षय रोग या आजाराचे निदान करण्यासाठी फायदा होणार आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुख सुविधा उपलब्ध होत आहेत ही आनंदाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
संपादन : अशोक मुरुमकर