कापूस कोंड्याची गोष्ट ः ओला झालेला कापूस सुकवण्यासाठीची पंचाईत

सुनील गर्जे
Sunday, 1 November 2020

केंद्र शासनाकडून कापूस खरेदी मंजुरी न मिळाल्याने  शासनाकडून महासंघामार्फत हमी भावानुसार होणारी कापूस खरेदी अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या कापूस खरेदीच्या आदेशाची  प्रतीक्षा आहे.

नेवासे : नेवासे तालुक्यात खरीप हंगामात कापसाचे २१ हजार ९७२ हेक्टर पैकी सुमारे २०-२१ टक्के कपाशी मृगनक्षत्रात सुरुवातीलाच शेतकर्यांनी पेरणी केली. त्या शेतकरयांचा कापूस वेचणी होऊन घरात आला आहे. या काळात पाऊस झाल्याने हा कापूस ओला झाला. पर्यायाने अनेक गावात घरासह किंवा शेतवस्त्यांसमोर ओला झालेला कापूस सुकविण्यासाठी उन्हात वाळू घातल्याचे हे चित्र नेवासे तालुक्यात पहायला मिळते.

नेवासे तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २०८ टक्के पाऊस झाला आहे.आधीच झालेल्या पावसाने सोयाबीन, तुरी, उसासह आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्यातरी पावसाने उघडीप दिली असलेतरी अधूनमधून भरून येणार आभाळ पाहून  शेतकर्यांच्या छातीत धडकी भरत आहे. आणखी पाऊस आल्यास हाती असलेले उरलीसुरली पीकही पावसाने हातची जाण्याची भीती शेतक-्यांना आहे.

नेवासे तालुक्यात २१ हजार ९७२  हेक्टरमध्ये कापूस आहे. कमी जास्त प्रमाणात तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहेत. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकर्यांच्या हातचा सोयाबीन गेले. कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव आहे. कुठे कपाशीचे झाड वाढले, मात्र त्याला
बोंड नाहीत तर कुठे पावसामुळे बोंडे तडकल्याची स्थिती आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतक-्यांच्या हाती थोड्याफार प्रमाणात कापूस लागला आहे. मात्र तोही ओला झाला आहे. त्यामुळे सध्या हा कापूस वाळविण्याची मोहीम अनेक गावात पहायला मिळते.

सतत झालेला पाऊस व पुन्हा पावसाची चिन्हे असल्याने विक्रीसाठी येणारा कापूस ओला राहू शकतो, याचा अंदाज खरेदीदारांना आल्याने अद्यापही म्हणावे तसे खासगी व्यापाऱ्यानी कापसाची खरेदी सुरू केलेली नसली तरी ऑक्टोबरच्या सुरवातीलाच काही व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केलेली आहे.

शेतकऱ्यांना शासन मंजुरीची प्रतीक्षा!

केंद्र शासनाकडून कापूस खरेदी मंजुरी न मिळाल्याने  शासनाकडून महासंघामार्फत हमी भावानुसार होणारी कापूस खरेदी अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या कापूस खरेदीच्या आदेशाची  प्रतीक्षा आहे.

 "अतिपावसाने कापूस ओला झाला आहे. विक्री व चांगला भाव मिळावा यासाठी वेचलेला कापूस सध्या उन्हात सुकविण्यात येत आहे. महासंघामार्फत कापूस खरेदी लवकर सुरू व्हावी. 
- निखिल शिंगी, कापूस उत्पादक शेतकरी, नेवासे, अहमदनगर

नेवासे कापूस-पाऊस दृष्टीक्षेपात
* कापूस पेरणी क्षेत्र : 21972 हेक्टर.
* तालुक्यात पर्जन्य सरासरी  : 468.7 मिमी.       
* प्रत्यक्षात : 975.9 मिमी.
* पाऊस टक्केवारी : 208 टक्के.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains soaked cotton in Ahmednagar district