नगर जिल्ह्यातील उच्चांक.. दोन वर्षांत 37 हजार कृत्रिम रेतन

सुनील नवले
Wednesday, 1 July 2020

प्रभात डेअरी लिमिटेड व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2018 पासून आतापर्यंत 37 हजार गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. कृत्रिम रेतनात प्रभात डेअरीचा नगर जिल्ह्यातील हा उच्चांक आहे.

श्रीरामपूर ः प्रभात डेअरी लिमिटेड व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने जून 2018 पासून आतापर्यंत 37 हजार गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. कृत्रिम रेतनात प्रभात डेअरीचा नगर जिल्ह्यातील हा उच्चांक असल्याची माहिती "प्रभात'चे संस्थापक व निर्मळ रुरल मल्टीपर्पज इन्स्टिट्यूशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर निर्मळ यांनी दिली. 

प्रभात डेअरीने शास्त्रीय पद्धतीने दुभत्या जनावरांची पैदास व्हावी, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढावी, यादृष्टीने मार्च 2013 पासून गावपातळीवर 20 ठिकाणी प्रभात गो-विकास केंद्रांची सुरवात केली. यासाठी निवडण्यात आलेल्या गरजू व होतकरू 55 तरुणांना बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. गायी व म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी एनडीडीबीच्या गुजरातमधील बीडज येथून रेतमात्रा आणून वापर केला. नोव्हेंबर 2016 ते जून 2018 या काळात प्रभात व बायफने 43 गो-विकास केंद्रे कार्यान्वित केली असून आतापर्यंत 37 हजार कृत्रिम रेतन केले आहे. 

इम्पोर्टेड व सॉर्टेड सीमेन 
नगर, औरंगाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 410 गावात पशुधनासाठी 43 गो-विकास केंद्रांद्वारे कृत्रिम रेतनाच्या सुविधा दिल्या जातात. रेतनासाठी गायीच्या एचएफ, जर्सी, सहिवाल, गीर व खिल्लार जातींच्या रेतमात्रांचा वापर केला जातो. काही गायींना इम्पोर्टेड व सॉर्टेड सीमेन वापरले आहे. म्हशींसाठी पंढरपुरी व मुऱ्हा जातीच्या रेतमात्रांचा वापर होतो. रेतमात्रा एनडीडीबीचे राहुरी सीमेन स्टेशन, बायफ व टीबीजी येथून पुरविल्या जातात. कृत्रिम रेतनास आवश्‍यक असलेले साहित्य दरमहा गो विकास केंद्रांना पोच केले जाते. कृत्रिम रेतन केलेली प्रत्येक गाय व म्हैस तसेच कृत्रिम रेतनातून जन्मलेल्या कालवडीच्या कानास बारा अंकी बिल्ला मारून त्याची ऍपमध्ये नोंद केली जाते. 

जून महिन्यात चार हजार 600 कृत्रिम रेतन करण्यात आले असून, लॉकडाऊन काळातही कृत्रिम रेतनाचे कार्य सुरू होते. सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी उपक्रम राबविण्याचे काम निर्मळ रुरल मल्टीपर्पज इन्स्टिट्यूशनला दिले असून पशुपालक व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निर्मळ यांनी केले. यासाठी सनफ्रेशचे राजेश लेले, योगेश गोडबोले, संदीप घाडगे, कल्पेश तक्ते, प्रभातचे डॉक्‍टर सर्वश्री वसंत करबाडे, सुरेंद्र रानडे, ब्रीज सोनी, भाऊसाहेब गुंड यांचे योगदान लाभले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest in the Nagar District.. 37 thousand artificial insemination in two years