महामार्ग प्रकल्पबाधितांचे तनपुरेंना साकडे

मोबदला देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन तनपुरे यांनी दिले.
महामार्ग प्रकल्पबाधितांचे तनपुरेंना साकडे

राहुरी : सुरत-हैदराबाद ग्रीन फिल्ड महामार्गातील भूसंपादनाबाबत राहुरी शहरातील प्रकल्पबाधितांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आपण शेतकऱ्यांच्या बरोबर असून, योग्य तो मोबदला देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन तनपुरे यांनी दिले.

शहरातील प्रकल्पबाधित शेतकरी गंगाधर सांगळे, अविनाश तोडमल, बापूसाहेब वराळे, प्रसाद मैड, जबीर शेख, नंदू वराळे, कृष्णा मैड, देवराव येवले, अशोक तोडमल यांनी आज (शनिवारी) मंत्री तनपुरे यांना त्यांच्या निवासस्थानी निवेदन दिले.

या महामार्गामध्ये राहुरी नगरपालिका हद्दीतील शहराच्या पश्चिमेकडील ३६ गट व सर्व्हे नंबरमधून हा मार्ग जाणार आहे. शहरातील ५ किलोमीटर अंतर महामार्गामध्ये असणार आहे. तालुक्यातील १९ गावांतून ४४ किलोमीटरमधील ४२८ हेक्टर शेतजमीन यात जात आहे.

कैफियत मांडताना शेतकरी म्हणाले, की शहरातील मोठा बागायत भाग यात जाणार आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. महामार्गालगत सर्व्हिस रोडही निश्चित नाही. ओढे, नाले व पावसाचे पाणी साचून शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. मागील काही वर्षांत या भागातील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार क्वचितच झाल्याने, तो दर गृहीत न धरता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला गृहीत धरावा.

मंत्री तनपुरे म्हणाले, की गुणक दोनचा नियम या रस्त्याला लागू आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र जात आहे, त्यांना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून न्याय दिला जाईल. राहुरी तालुक्यातील सर्वाधिक गावे या महामार्गात जाणार असल्याने, आपण जातीने लक्ष घालून प्रकल्प अधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा सखोल चर्चा करू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com