Ahmednagar News : पुस्तकांचा छंद जिवा लावी पिसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hobby of collecting books Shabbir Shaikh's initiative list of writers in district ahmednagar

Ahmednagar News : पुस्तकांचा छंद जिवा लावी पिसे

अहमदनगर : छंद कोणताही असो, तो जीवनभर जपला जातो. संगीत, वाचन, खेळ असे वेगवेगळे छंद जपण्यासाठी आयुष्यातील मोठा आर्थिक खर्च व वेळ दिला जातो. असाच एक पुस्तकवेडा अवलिया अहमदनगर जिल्ह्यात आहे. शेख शब्बीर अहमद बिलाल असे त्यांचे नाव आहे.

शब्बीरभाई म्हणून ते साहित्य विश्वात सर्वांच्या परिचयाचे. शेख अहमदनगर शहरातील गोविंदपुरा भागात राहतात. पुस्तकाचा हा छंद त्यांनी तब्बल २० ते २५ वर्षांपासून जोपासला. या व्यतिरिक्त विविध देशांतील नाणे, तिकिटे संकलनही त्यांच्याकडे चांगले आहे. त्यांना लहानपणापासूनच वाचन तसेच पुस्तकांची आवड होती.

त्यांचे वडील पोलिस खात्यात नोकरीस होते. त्यामुळे बदल्या वारंवार होत असत. साहजिकच त्यांचे शिक्षण विविध तालुक्यांत झाले. प्राथमिक शिक्षण वांबोरी, राहुरी, श्रीगोंदे, कोपरगाव आदी ठिकाणी झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगर शहरात झाले. त्यांनी बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर इंडियन सिमलेस या कंपनीत नोकरी स्वीकारली. साहित्य संमेलनाला जाण्यासाठी सुटी न मिळाल्यास त्यांनी अनेकदा बिनपगारी सुटी टाकून हा छंद जोपासला.

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था असलेली ‘इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशियन रिसर्च अॅण्ड एक्सचेंज (बंगरुळ) या संस्थेने त्यांना बंररुळू येथे बोलावून त्यांना एका आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी करून घेतले. त्यांचा गौरव केला. पुस्तके जमा करण्याचा छंद नाही, तर त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. ‘अहमदनगर साहित्य वैभव’ ही पुस्तकसूची २०१३ मध्ये प्रकाशित करण्यात आली.

‘पहाडगाथा’ या प्रवीण जिलवाले या लेखकाच्या पुस्तकाचे मराठीत त्यांनी अनुवाद केला. तसेच विजय जावळे यांचे ‘मिट्टी की सौगात’ हे पुस्तक अनुवादित केले. शब्बीर शेख हिंदी अनुसंधान प्रसार केंद्राचे अध्यक्ष आहेत. त्यामाध्यमातून काव्य मैफल, साहित्यिक कार्यक्रम भरवितात. त्यांच्या बंगल्यात एक स्वतंत्र खोली खास पुस्तकांसाठी केली आहे.

तेथे हजारो पुस्तकांचा खजिना आहे. अनेक डबल झालेली पुस्तके त्यांनी विविध ग्रंथालयांना भेट म्हणून दिले आहेत. या कामात पत्नी रिझवाना यांची त्यांना मदत होते. त्यांची एक मुलगी अमरीन शेख ही जर्मनीला असते. अतिया खान ही नगरला असते. मुलगा नदीम हा पुण्यात एका कंपनीत नोकरीला आहे. हे सर्व कुटुंबीय त्यांच्या छंद जपवणुकीला मदत करतात.

जिल्ह्यातील लेखनसंपदा एकत्रित

जिल्ह्यात साहित्य संमेलन कोठेही असो, शब्बीर शेख तेथे हजर राहणार. आलेल्या लेखकांची विचारपूस करणार. त्यांचे पुस्तक घेऊन आपल्या सूचीत नाव समाविष्ट करणार. त्यांनी आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील २३०० लेखकांची ६५०० पुस्तके संकलित केले आहेत. त्यामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्याचा इतिहास तर आहेच, शिवाय जिल्ह्यातील लेखनसंपदा एकत्रित आढळते.

टॅग्स :AhmednagarBook