मला जिल्हा माहितीय, चांगलंच काम करू, सीईओंनी घेतला पदभार

दौलत झावरे
Friday, 23 October 2020

क्षीरसागर म्हणाले, ""जिल्ह्यात आपण पूर्वीही काम केले आहे. नेवासे तहसीलदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तसेच संगमनेरला प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. मध्यंतरी नगरशी संपर्क नसला, तरी पुन्हा येथे यायला मिळाल्याचा आनंद आहे.

नगर ः ""जिल्ह्यात पूर्वी महसूल विभागात काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याची आपणास ओळख झालेली आहे. आता ग्रामविकास विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे. शासकीय योजनांची निर्दोष अंमलबजावणी करून त्या लाभार्थींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करू,'' अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. 

क्षीरसागर यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांनी त्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष प्रताप शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनील गडाख, मीरा शेटे, उमेश परहर, काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सदाशिव पाचपुते, अजय फटांगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मंगला वराडे, सुनीलकुमार राठी आदी उपस्थित होते. 

क्षीरसागर म्हणाले, ""जिल्ह्यात आपण पूर्वीही काम केले आहे. नेवासे तहसीलदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, तसेच संगमनेरला प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. मध्यंतरी नगरशी संपर्क नसला, तरी पुन्हा येथे यायला मिळाल्याचा आनंद आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळात राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण भागावर अधिक लक्ष देऊन जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करू. यासंदर्भात सर्व खातेप्रमुखांकडून आढावा घेऊन त्यावर काम करणार आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I know the district, we will do a good job, said Kshirsagar