पारनेर कारखान्याच्या २४ एकर जमिनीची बेकायदेशीर आदलाबदल

मार्तंड बुचुडे
Friday, 11 September 2020

पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्यानंतर कारखान्याकडे  उरलेल्या 138 एकर जमीनीपैकी सुमारे 24 एकर जमीन पारनेरच्या अवसायक यांनी क्रांती शुगरला बेकायदेशीर अदलाबदल करून दिली असल्याचे माहिती अधिकारातुन उघड झाले आहे.

पारनेर (अहमदनगर) : पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्यानंतर कारखान्याकडे  उरलेल्या 138 एकर जमीनीपैकी सुमारे 24 एकर जमीन पारनेरच्या अवसायक यांनी क्रांती शुगरला बेकायदेशीर अदलाबदल करून दिली असल्याचे माहिती अधिकारातुन उघड झाले आहे. 

कारखान्याची विक्री केली तेव्हा ज्या जमीनीवर कारखाना उभा आहे, ती जमीन बँकेकडे तारण नव्हती. आज जिथे कारखाना उभा आहे. ती जमीन कारखान्याकडे म्हणजेच अवसायाकाकडे आहे. ही बाब कारखाना विकत घेणाऱ्या क्रांती शुगर यांना समजली. त्यानंतर क्रांती शुगर यांनी अवसासायक यांना हाताशी धरून, प्रादेशिक साखर सहसंचालक व पुणे येथील साखर आयुक्त यांना हाताशी धरूऩ त्या जागेची अदला बदल करून घेतली असल्याचे दिसुन येते आहे. 

कारखाना ज्या नऊ हेक्टर 28 आर जागेवर ऊभा आहे. ती जागा क्रांती शुगरला देऊन त्या बदल्यात लोणीमावळा शिवेलगत असणारी मोकळी जागा विनामोबदला बदलून दिली आहे, असे माहिती अधिकारातून दिसून येत आहे.

यापुर्वी पारनेर कारखान्याची उरलेली 138 एकर जमीन अवसायकाने नोव्हेंबरमध्ये विक्रीला काढली होती. तेव्हा कारखाना बचाव समितीने विरोध करत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यामुळे निघोज येथील मळगंगा कन्सस्ट्रक्शनने भरलेली निविदा स्वतः मागे घेतली असल्याने अवसायकास  विकता आली नाही.

अवसायकाने कोणतेही काम न करता साडेसात कोटींचा खर्च दाखवला आहे. त्यामुळे अवसायक हटवण्यासाठी कारखाना बचाव समितीने या पुर्वीच मागणी केली आहे. कारखाना विक्री विरोधात  सध्या उच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले. त्याबाबत बचाव समिती पाठपुरावा करत असल्याचे बबन कवाद, साहेबराव मोरे यांनी सांगीतले. जमीनीची बेकायदेशीर अदलाबदलप्रकरणी झालेली नोंद रद्द करण्याची मागणी करणार असून ती मान्य झाली नाही तर त्याविरोधात न्यायायात दाद मागण्यात येणार असल्याचे रामदास घावटे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal exchange of 24 acres of Parner factory land