ट्रॅक्टरला बेकायदेशीर ट्रॉली 'बेफाम'! उसाची जीवघेणी वाहतूक; कारवाईची मागणी

सुनील गर्जे
Tuesday, 3 November 2020

सध्या साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू असल्याने अनेक भागात गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ऊस भरून वाहतूक होतानाचे चित्र आहे.

नेवासे (अहमदनगर) : सध्या साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू असल्याने अनेक भागात गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ऊस भरून वाहतूक होतानाचे चित्र आहे. साखर कारखान्याकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर ट्रॅक्टरला अनधिकृतपणे दुसरी ट्रॉली लावून क्षमतेहून अधिक ऊस भरून सर्रास वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त व बेजबाबदारपणे ट्रॅक्टर- ट्रॉलीसह चालकांवर आरटीओने कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. 

नेवासे तालुक्यात ज्ञानेश्वर, मुळा असे दोन साखर कारखाने असलेतरी तालुक्यातील ऊस शेवगावसह जिल्ह्यातील इतर तालुक्याबरोबरच मराठवाद्यातील काही साखर कारखाने ऊस घेऊन जातात. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक करताना रस्त्यात दोन वर्षात शेवगाव- नेवासे- श्रीरामपूर रस्त्यावर  ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर डबल ट्रॉलीमुळे सुमारे ११ जणांना वेगवेगळ्या अपघातात आपले प्राण गमवावे लागले तर दोनशेच्यावर चारचाकी चालक, दुचाकीस्वार व पादचारी जायबंदी झाले. काहींना अपंगत्व आलेले आहे. गेल्यावर्षी देवगाव येथे रस्त्याचे कडेने घरी जात असलेल्या उसने भरलेल्या ट्रॅक्टर- डबल ट्रॉलीने चिरडल्याची दुर्दवी घटना घडली होती.

कुकाणे भेंडे रस्त्यावरील फारशी पुलाजवळ उसाचा भरलेला एक ट्रेक व दोन डबल ट्रॉली असलेले ट्रॅक्टर पलटी झाले. मात्र तर दैव बलवत्तर म्हणून या अपघातात एका चारचाकीतील पाचजण तर दोन दुचाकी वरील पाच जणांचे दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचले.  त्यानंतर काही दिवस पोलिसांनी अवैध ऊस वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोहीम राबविली होती. परंतु यावर्षी सद्य:स्थितीत अवैध प्रकारची जीवघेणी ऊस वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात सुरू झाला असून नेवासे- शेवगाव रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर ट्रैक्टरांची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. यामुळे छोट्या- मोठ्या अपघातांची शक्यता असल्याने आरटीओ व पोलिसांनी  संयुक्त रित्या कारवाई करावी अशी वाहनधारकांची  मागणी आहे. 

ट्रॅक्टर चालकांत जनजागृतीची गरज
साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतूकीसाठी प्रामुख्याने ट्रँक्टर ट्रॉलीला प्राधान्य दिले जाते. मात्र, चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात नाही. ट्रॅक्टर चालकांवर कोणाचाही वचक नसल्याने बेफिकीर व बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जात आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर मालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते.

क्षमतेपेक्षा अधिक उसाचा भरणा उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस ट्रॉलीत भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४-१५ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८-२० टन ऊस भरला जातो. नफा कमाविण्यासाठीचा हा प्रकार इतरांसाठी जीवघेणा ठरत आहेत. ऊस वाहतुकीसाठी विनापासिंग ट्रॉलीचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरांच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाइटच्या जोरावर चालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात. 

ऊस वाहतुकीच्या वाहनांना सेवा रस्ता सक्तीचा करावा. सर्व वाहनांना सुरक्षेच्या उपाययोजना सक्तीच्या कराव्यात. रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक बंदीवा विचार व्हावा. ऊस वाहतुकीसह अवैध वाहन पार्किंगवर कारवाई करावी, असे चालक राहुल जावळे यांनी सांगितले.

ओव्हरलोड उसवाहतुक धोक्याचीच आहे. याबाबत  लवकरच जिल्हाधिकारी, सर्व साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक यांची बैठक घेण्यात येणार आहे.  साखर कारखाना प्रशासनाने वाहतुकीच्या नियमाबद्दल ऊस वाहतूक करणार्या शेतकरयांना व ट्रॅक्टर चालकांना माहिती देणे गरजे आहे. ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाईची मोहीम हाती घेणार आहे. 
- अशपाक खान, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर विभाग 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal transport of sugarcane by tractor in Nevasa taluka