कर्जतकरांच्या मदतीला भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही ‘दादा’

निलेश दिवटे
Wednesday, 26 August 2020

भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याचे कर्जत शहरातून होणारे काम बंद ठेवावे आशा प्रकारची सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधून दिल्या आहेत.

कर्जत (अहमदनगर) : भिगवन- कर्जत- अमरापूर रस्त्याचे कर्जत शहरातून होणारे काम बंद ठेवावे आशा प्रकारची सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार रोहित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क साधून दिल्या आहेत. या निर्णयामुळे कर्जत येथील व्यापारी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचीन घुले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. भिगवन कर्जत अमरापूर राज्य मार्ग 54 याचे काम कर्जत शहराच्या दोन्ही बाजूला सुरू आहे. यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूला रस्त्या लगतं असलेल्या व्यावसायिकामध्ये पुढे काय होणार? अशी भीती निर्माण होत जीव टांगणीला लागला होता. याबाबत सचिन घुले व सुनील शेलार यांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून या कामाबाबत कल्पना दिली होती. वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणली. यानंतर आमदार पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधित काही दिवस काम स्थगित ठेवण्याच्या सूचना दिल्या.

आमदार पवार म्हणाले, या रस्त्याचे काम पूर्वीच मंजूर असून त्याच वेळी बाह्यवळन मार्गाचा विचार होणे आवश्यक होते. मात्र दुर्दैवाने तो झाला नाही. या बाबत संबंधित व्यावसायिक यांची बैठक घेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत कर्जत शहरातील काम तूर्तास बंद ठेवावे, आशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती घुले व शेलार यांनी दिली आहे.

कर्जत शहरातील याच प्रश्नी कर्जत शहर मेन रोड व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची नगर येथे भेट घेतली. सदर कामांमुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांची मोठे नुकसान होत आहे. सध्या कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. या विषयी शिष्टमंडळ व खासदार डॉ. विखे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. 

त्यानंतर डॉ. विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तूर्त काही दिवस काम थांबविण्याचा सूचना केल्या. कर्जतमध्ये येत सर्व व्यावसायिकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात अध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष विष्णुपंत नेटके, सचीव शरद मेहेत्रे, श्रीकांत तोरडमल आणि संतोष काळे यांचा समावेश होता.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative of NCP and BJP leaders for road works in Karjat