
ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया असल्याने स्थानिक पातळीवर निवडणूक होणे अपरिहार्य आहे.
संगमनेर (अहमदनगर) : ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया असल्याने स्थानिक पातळीवर निवडणूक होणे अपरिहार्य आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या पदासाठी पैशांचा वापर करुन, लिलाव करीत बोली लावणे ही घटना दुर्दैवी आहे, अशी खंत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दोन कोटी पाच लाख रुपयांची बोली लागली होती. या घटनेबाबत विचारले असता थोरात म्हणाले, ""ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक पातळीवर व्हावी हे योग्य आहे. मात्र निवडणुकीनंतर पक्षीय वैर व द्वेशभावना विसरुन गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र यावे. निवडणूक बिनविरोध करणेही चुकीचे नाही. मात्र गावपातळीवर एकी टिकणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय निवडणूक नसते. विकासाच्या मुद्द्यावर गावपातळीवर निवडणुका व्हायला हव्यात. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेणे योग्य आहे. मी 36 वर्षांच्या आमदारकीच्या काळात कधीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग घेतला नाही,'' असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर