राजूर ग्रामपंचायतीचे शिपाई जाधव गावाचे कोरोनापासून बचाव करण्यासाठी करताहेत प्रबोधन

 शांताराम काळे
Saturday, 26 September 2020

राजूर ग्रामीण रुग्णालयात रोज दहा पंधरा रुग्ण सापडत आहे. किट संपल्या आहेत. उपचार घ्यायचे तर अकोले संगमनेर तिथेही बेड उपलब्ध नाहीत. तरी देखील लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

अकोले (नगर) : तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, गावात कोरोना आला आहे. त्याने शतक पार केलयं. तुमच्या दारात तो उभा आहे. जबाबदारीने वागा, घरात बसा, उगाच बाहेर फिरू नका. काम असेल तरच बाहेर पडा, माय बापानो तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे, असे ग्रामपंचायतीचे शिपाई दशरथ सखाराम जाधव पोट तिडकिने सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत गाडीला स्पीकर लावून ओरडून प्रबोधन करत आहे. पण ऐकतील ती माणसे कशी ना. 

राजूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शतक पार करून हा आकडा पुढे गेला आहे. ४० गावाचे केंद्र असलेले राजूर कोरोनाबाधित होत आहे. राजूर ग्रामीण रुग्णालयात रोज दहा पंधरा रुग्ण सापडत आहे. किट संपल्या आहेत. उपचार घ्यायचे तर अकोले संगमनेर तिथेही बेड उपलब्ध नाहीत. तरी देखील लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. सोशल मीडियावर फक्त आव्हान केले जाते, मात्र सामाजिक कार्यकर्ते संस्था पुढे येत नाही

महसूल, पोलिस, स्थानिक कमिटी यांनी एकत्र येऊन नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र मध्यंतरी मतभेद झाल्याने यंत्रणा ढेपाळली आहे. पुढारी अधिकारी यांचे काही असो मात्र राजूर ग्रामपंचायतीचे शिपाई रोज सकाळी उठून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून स्पीकर लावून नियम पाळण्याचे आव्हान करत आहे. मात्र जे व्यवसायिक बाधित होऊन उपचारानंतर परत आले त्यांनी होम क्वारंटाईन होण्याऐवजी दुकाने उघडल्याने अडचणी वाढत आहे. 

सरपंच गणपत देशमुख म्हणाले, राजूर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने तठस्थ भूमिका न घेता पोलिस, महसूल, स्थानिक कमिटी एकत्र येऊन या कोरोनाचा मुकाबला करता येईल. तसेच यात कृपया राजकारण आणू नये व प्रशासनाने सरपंच, स्थानिक कमिटीला अधिकार देणे आवश्यक आहे, केवळ दंड करून प्रश्न सुटणार नाही.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jadhav, a Gram Panchayat soldier is conducting a prabodhan to protect him from the corona in Rajur