कामगारांसाठी वेतनवाढ करार करण्यास काळे कारखाना कधीही तयार

मनोज जोशी
Saturday, 31 October 2020

यंदा तुलनेत जवळपास सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. साखरेचे भाव स्थिर ठेवणे व कारखान्यांसोबत दीर्घ मुदतीचे इथेनॉल खरेदी करार करण्याचे धोरण घेऊन केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिला आहे.

कोपरगाव ः राज्यातील ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळाली; मात्र दीड वर्षापासून साखर कामगार वेतनवाढ कराराच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हा करार झाला तर लगेचच सुधारित वेतनवाढ लागू करण्याची तयारी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दर्शविली. अशी तयारी दर्शविणारे साखर कारखान्याचे ते पहिले अध्यक्ष ठरले. त्यामुळे साखर कामगार सभेचे नितीन गुरसळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. 

केंद्र सरकारच्या तिसऱ्या वेतन आयोगानंतर साखर कामगारांना वेतन आयोग लागू करण्याची परंपरा खंडित झाली. राज्यातील साखर उद्योगाचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे वेतनवाढीचा विषय सोपविण्यात आला. त्यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून त्रिपक्षीय समितीचा फार्म्युला निश्‍चित केला.

या समितीत कामगार संघटना, साखर कारखाने व साखर संघ यांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. वेतन आयोगाऐवजी या त्रिपक्षीय समितीचा करार पुढे आला. 
या समितीने मागील वेळी साखर कामगारांच्या वेतनात पंधरा टक्के वाढ केली.

अर्थात, आर्थिक ओढाताण असलेल्या कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी या वेतनवाढीबाबत आढेवेढे घेतले. मात्र, ज्या कारखान्यांची ऐपत आहे, त्यांनी ही वेतनवाढ लागू केली. त्रिपक्षीय समितीच्या या कराराची मुदत संपून दीड वर्ष उलटले. त्यामुळे कामगारांना वेतनवाढीची प्रतीक्षा आहे. तोडणी कामगारांच्या ऊसतोडणी दरात वाढ केल्यानंतर साखर कामगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

यंदा तुलनेत जवळपास सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे. साखरेचे भाव स्थिर ठेवणे व कारखान्यांसोबत दीर्घ मुदतीचे इथेनॉल खरेदी करार करण्याचे धोरण घेऊन केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिलासा दिला आहे.

यंदाचे वर्ष तुलनेत बरे असल्याने, वेतनवाढीचा करार त्वरित केला जावा, अशी साखर कामगार संघटनांची अपेक्षा आहे. त्यात सुधारित वेतनवाढ जाहीर झाली तर ती त्वरित लागू करण्याची घोषणा करून, आमदार आशुतोष काळे यांनी हा विषय चर्चेत आणला. अरुण पानगव्हाणे, विक्रांत काळे, प्रकाश आवारे, वीरेंद्र जाधव व संजय वारुळे उपस्थित होते. 
 

साखर कामगार हा साखर उद्योगाचा कणा आहे, अशी भावना माजी खासदार (कै.) शंकरराव काळे यांनी जपली. कामगारहिताला प्राधान्य दिले. आम्ही ही परंपरा सुरू ठेवली. त्रिपक्षीय समितीने यंदा साखर कामगार वेतनवाढीचा निर्णय घेतला, तर आम्ही लगेचच काळे कारखान्याच्या कामगारांना वेतनवाढ लागू करू. पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही वाढ लागू होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. 
- आमदार आशुतोष काळे, अध्यक्ष कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kale factory ready to make wage agreement for workers