कर्जत नगर पंचायतीच्या आरक्षणाने नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अडचण

नीलेश दिवटे
Tuesday, 10 November 2020

आरक्षणाच्या चिठ्ठ्या मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या. आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले.

कर्जत : आगामी नगरपंचायत निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले. त्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची कोंडी झाली आहे. आता त्यांना नवीन प्रभाग शोधून निवडणूक लढवावी लागणार आहे.

काहींना सोयीचे, तर काहींची अडचण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, मुख्याधिकारी गोविंद जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

कर्जत शहर व तालुक्याच्या राजकारणात नामदेव राऊत यांचे वर्चस्व आहे. प्रारंभी शिवसेनेच्या माध्यमातून आता भाजपातून त्यांची राजकीय कारकीर्द बहरत आहे. परंतु आरक्षण सोडतीने त्यांची गोची केली आहे. राऊत हे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत तर प्रतिभा भैलुमे या नगराध्यक्ष आहेत. त्यांनाही दुसऱ्या प्रभाग निवडणुकीसाठी शोधावा लागेल.

आरक्षणाच्या चिठ्ठ्या मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या. सोडतीत नगराध्यक्ष प्रतीभा भैलुमे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यांना दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल. 

प्रभागनिहाय आरक्षण असे : एक- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दोन- नागरिकांचा मागास प्रवर्ग, तीन- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), चार- सर्वसाधारण (महिला), पाच- नागरिकांचा मागास प्रवर्ग, सहा- सर्वसाधारण, सात- सर्वसाधारण, आठ- सर्वसाधारण, नऊ- सर्वसाधारण (महिला), दहा- सर्वसाधारण (महिला), अकरा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), बारा- सर्वसाधारण, तेरा- सर्वसाधारण, चौदा- सर्वसाधारण महिला, पंधरा-अनुसूचित जाती, सोळा- अनुसूचित जाती (महिला), सतरा- सर्वसाधारण महिला. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat Nagar Panchayat's reservation is a problem for the Mayor-Deputy Mayor