कोरोनामुळे कार्तिक स्वामी यात्रा यंदा रद्द

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

या पर्वकाळात महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे, अशी परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी दर्शनासाठी कडक नियमावली तयार केली आहे. 

पुणतांबे : कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर वर्षी कार्तिक स्वामी मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या वर्षी कोरोना संकटामुळे बाहेरगावांहून येणाऱ्या भाविकांना दर्शनास येण्यास कोरोना समितीने मनाई केल्याने, मंदिर परिसरात यात्रा भरणार नाही. 
पुणतांबे येथे गोदाकाठावर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे. दर वर्षी कार्तिक पौर्णिमा- कृत्तिका नक्षत्राच्या पर्वकाळात भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात. या वर्षी रविवारी (ता. 29) दुपारी 12.51 ते सोमवारी सकाळी सहापर्यंत कृत्तिका नक्षत्र व पौर्णिमा आहे. हाच कार्तिक स्वामी दर्शन पर्वकाळ असल्याचे पुरोहित शरद गोर्हे यांनी सांगितले.

या पर्वकाळात महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे, अशी परंपरा आहे. मात्र, या वर्षी कोरोनामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी दर्शनासाठी कडक नियमावली तयार केली आहे. 

सरपंच डॉ. धनंजय धनवटे व कार्तिक स्वामी भक्त मंडळ यांनी मिळून, कार्तिक स्वामी मंदिर परिसरात गर्दी टाळण्यासाठी दर्शनास मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 
बाळासाहेब भोरकडे, जिल्हा परिषद सदस्य श्‍याम माळी, शुक्‍लेश्‍वर वहाडणे, कुमार हासे या वेळी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartik Swami Yatra canceled this year