
Ahmednagar Crime News: केडगावातील प्रा. होले खुनाचे रहस्य उलगडले; कुख्यात गुंड अजय चव्हाणची टोळी जेरबंद
अहमदनगर : येथील केडगाव बाह्यवळण रस्त्यावर हॉटेल के-९ समोर गोळीबार करून प्राध्यापक शिवाजी किसन उर्फ देवा होले यांची खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेला यश आले आहे.
वळणपिंप्री (ता. राहुरी) येथील कुख्यात गुंड अजय भाऊसाहेब चव्हाण (वय २५) याच्या टोळीने हा खून केला. या टोळीने साकुर (ता. संगमनेर) येथील भगवान पेट्रोल पंप आणि घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर्सचे दुकान लुटल्याचे निष्पन्न झाले आहे. (Kedgaon Prof hole murder mystery revealed gangster Ajay Chavan gang jailed Ahmednagar Crime News)
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रसंगी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक निरीक्षक सोपान गोरे, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दीपक शिंदे, सागर ससाणे, रोहित येमूल, रणजित जाधव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत उपस्थित होते.
अजय चव्हाण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने पुणे परिसरात रस्ता लूट, चोऱ्या असे ११ गंभीर गुन्हे केलेले आहेत. एका गुन्ह्यात त्याला जामीन झाल्यावर तो गावी आला.
त्याने सागर वसंत जाधव ( वय २६, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी) व राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय २७, रा. खेडले परमानंद, ता. नेवासे) यांच्या मदतीने रस्ता लुटीसाठी टोळी तयार केली. ज्या रस्त्यावर वाहतूक कमी आहे, त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी दुचाकीस्वारांना लुटण्याचे त्याने साथीदारांना सांगितले.
असा केला प्रा. शिवाजी होलेंचा खून
अजय चव्हाण हा साथीदारांसमवेत ता. २३ फेब्रुवारी रोजी केडगाव बाह्यवळण रस्त्यावर रस्ता लुट करण्याच्या उद्देशाने आला होता. केडगावातील हॉटेल के ९ समोर एक दुचाकी लावलेली होती. हॉटेलच्या आडोशाला दोघे जण दारु पित बसलेले होते.
या टोळीने या दोघांना लुटण्याचे ठरविले. तिघे ही चाकू व गावठी पिस्तोल घेऊन आले. गळ्याला चाकू लावून पैसे देण्यासाठी धमकावू लागले. त्याचवेळेस प्रा. होले हे पळू लागताच एकाने हातातील पिस्तोलने त्यांच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला.
त्यांचे मित्र अरुण नाथा शिंदे (रा. नेप्ती, ता. नगर) याच्याजवळील रोख व मोबाईल फोन असा एकूण ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने लुटला. शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनासह लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संगमनेर तालुक्यात लुटीला प्रारंभ
तिघांनी ता. २६ फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुक्यात लुटीच्या उद्देशाने गेले. पुणे -नाशिक महामार्गाजवळ घारगाव शिवारात लक्ष्मी टायर्सचे दुकान हे निर्जनस्थळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि त्याच्या दुचाकीचा चावी हिसकावून घेतली. त्याची दुचाकी घेऊन पलायन केले. या महामार्गाने गेल्यास पोलिसांना सापडले जाऊ शकतो, म्हणून त्यांनी साकूरमार्ग पळून जाण्याचे ठरविले. दोन्ही वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी साकूरमधील भगवान पेट्रोलपंपावर आले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
पेट्रोलपंपावरील कॅशिअकडील पैसे पाहताच नियत फिरली
पंपावर तीनच कर्मचारी होते. एक जण पेट्रोल-डिझेल देण्याचे काम करत होता. दुसरा कर्मचारी कॅशिअरकडे पैसे जमा करत होता. त्याच वेळेस तिघे पंपावर आले. त्यांनी कॅशिअर पैसे मोजत असल्याचे पाहिले.
पैसे पाहताच त्यांची नियत फिरली. एकाने पाणी पिण्याच्या बहाण्याने पंपाच्या कॅबिनजवळ जाऊन किती पैसे आहेत, याचा अंदाज घेतला. तात्काळ लुटण्याचा निर्णय घेतला.
तिघांनी पिस्तोल आणि चाकूच्या धाक दाखवून पंपावरील २ लाख ५० हजार ७४७ रुपये रोख रक्कम लुटली. या दोन्ही घटनेबाबत घारगाव पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
असा लागला शोध
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दोन पथके तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यावरुन गुन्ह्याचे तपासास सुरुवात केली. तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती घेत होते.
दरम्यान खबऱ्याकडून माहिती मिळाली की, केडगाव खुनाचा गुन्हा, लक्ष्मी टायर दुकान व पेट्रोलपंप लुटीचा गुन्हा हा आरोपी अजय चव्हाण याने त्याचे साथीदारासह केला आहे. तो त्याचे घरी वळणपिंप्री, (ता. राहुरी) येथे आल्याची माहिती मिळाली.
पथकाने त्याच्यावर झडप घालून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले.