सिद्धटेक: माळरानात शेतकऱ्याने पेरलं 'कष्ट'; आज घेतोय लाखोंचं उत्पन्न

Kisan Dhande a farmer from Siddhatek has developed horticultural land.jpg
Kisan Dhande a farmer from Siddhatek has developed horticultural land.jpg

सिद्धटेक (अहमदनगर) : कष्टाच्या जोडीला जिद्द बाळगल्यास अशक्य कामही सहज शक्य होते, याचा प्रत्यय येथील किसन धांडे या 'पारंपरिक' पद्धतीने शेती करीत असलेल्या शेतकऱ्याकडे पाहून येतो. सत्तरीकडे वाटचाल सुरू असलेल्या या प्रगतीशील शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने माळरान जमिनीचे रुपांतर थेट बागायती जमिनीत केले आहे. त्यातून दरवर्षी ते लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.

नऊ एकर क्षेत्र असलेल्या धांडे यांच्या शेतीत पीकविविधता आढळून येते. ऊसाबरोबरच कांदा या नगदी पिकाचे उत्पादन ते घेतात. स्वतंत्र विहीरीच्या पाण्यामुळे आंबा, चिकू, कागदी लिंबू, चिंच या फळपिकांची लागवडही त्यांनी केली आहे. प्रयोगशील असल्याने घेवडा, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांच्या लागवडीतूनही धांडे यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. किसन धांडे यांनी पूर्णपणे माळरान असलेली जमीन लागवडीयोग्य बनवली आहे. मोठे-मोठे दगड मशीनच्या सहाय्याने तर छोटे दगड स्वतः हाताने सुबकतेने रचून शेतशिवाराचे सुंदर चित्रच जणू त्यांनी काढले आहे.

पत्नी रंजना, मुलगा ज्ञानेश्वर, सून श्रद्धा हे सर्व त्यांना शेतीच्या कोणत्याही कामात पूर्णपणे झोकून देऊन मदत करतात. बारावी विज्ञान शाखेतून चांगली गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या ज्ञानेश्वरने पुढे जाऊन कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतीत कष्ट करून स्वतः मालक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. शेतीबरोबरच सर्व प्रकारची अवजारे खरेदी करून स्वतःच्या शेतीसह इतरांच्या शेतात माफक दरात मशागतीही तो करून देतो. यातूनही धांडे कुटुंबाने चांगले अर्थार्जन केले आहे.

बांधापासून कमावले लाखो रुपये

किसन धांडे यांनी शेतातील अंतर्गत बांधावरच शेवगा, गवतीचहा, जांभूळ, नारळ यांसारखी पिके घेतली आहेत. त्यापासून दरवर्षी ते लाखोंचे उत्पन्न मिळवतात. जमिनीचे संधारण त्यामुळे शक्य होत असल्याचे ते आवर्जून इतरांनाही सांगतात.

सिद्धटेक सारखी 'हुकमी' बाजारपेठ

मोठ्या कष्टाने पिकविलेल्या दर्जेदार मालाला किसन धांडे यांनी बाजारपेठही तशीच शोधली आहे. अष्टविनायक क्षेत्र असल्याने भाविकांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे चिकू, बोर, गवतीचहा तसेच विविध प्रकारची भाजीपाला पिके येथे हातोहात विकली जातात. त्यामुळे उत्पादीत शेतमाल इतरत्र पाठवण्याची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे या मालाला चांगला बाजारभावही येथे मिळतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com