वसुंधरा अभियानात कोपरगावचे पाऊल पडले पुढे

मनोज जोशी
Saturday, 2 January 2021

या अभियानामध्ये पंचतंत्राच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ऑक्‍टोबर 2020 पासून अभियान राज्यात सुरू झाले आहे. 

कोपरगाव : नगरपालिकेने शासनाच्या "वसुंधरा'अभियानात सहभाग नोंदविला असून, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वाच्या आधारे शहरात अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशाद सरोदे यांनी दिली. 

ते म्हणाले, की दिवसेंदिवस शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे संतुलन राखणे तितकेच गरजेचे आहे. या उद्देशाने राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान हाती घेतले. स्थानिक स्वराज्य संस्था, निवडक गावे व शहरामध्ये अभियानाला सुरुवात झाली असून कोपरगाव नगरपरिषदेने पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

या अभियानामध्ये पंचतंत्राच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ऑक्‍टोबर 2020 पासून अभियान राज्यात सुरू झाले आहे. 

पृथ्वी तत्त्वानुसार शहरातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि जमिनीचे धुपीकरण कमी करणे आदी कामे केली जाणार आहे. जल तत्त्वानुसार नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्त्रोतांचे रक्षण व संवर्धन आणि नदी किनाऱ्याची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार आहे.

वायू तत्त्वानुसार हवेतील प्रदूषणाचे मोजमाप, धूळ कमी करणेकामी रस्त्याच्या बाजूला हरिती करण करणे. अग्नी तत्त्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, त्याचा अपव्यय टाळून ऊर्जा बचत करणे अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे.

आकाश तत्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपातील मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहे. वृक्ष लागवड व त्यांचे जतन, नदी स्वच्छता, घरातील कचरा वर्गीकरण करून देणे याबाबतीत सर्वच नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरोदे यांनी केले. 

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदांचा शासनाकडून गौरव केला जाणार आहे. अभियानामध्ये पृथ्वी 600, जल 400, अग्नी 100, वायू 100 आणि आकाश 300 असे गुण देण्यात आलेले आहेत.

- विजय वहाडणे, नगराध्यक्ष, कोपरगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kopargaon's participation in Vasundhara Abhiyan