esakal | रात्री गाढ झोपेत असताना घराचे पत्रे तोडून साक्षात मृत्यूच अंगावर कोसळला
sakal

बोलून बातमी शोधा

The leopard broke the roof of the house and fell inside

आदिवासी भागातील मुरशेत (ता. अकोले) येथे हा थरार घडला. दुंदा गोलवड यांचे कुटुंब येथे राहते. त्यांच्या घराशेजारील झाडावर रात्रीच्या वेळी कोंबड्या बसतात.

रात्री गाढ झोपेत असताना घराचे पत्रे तोडून साक्षात मृत्यूच अंगावर कोसळला

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : ते थर्टी फर्स्टच्या संध्याकाळी निवांत झोपले होते. नवीन वर्ष सुखसमृद्धी घेऊन येईन असा त्यांनी संकल्प केला होता. परंतु रात्री भलतंच घडलं. घरावरील पत्रे तोडून साक्षात मृत्यूच त्यांच्या अंगावर कोसळला. अंगावरील पांघरून काढून पाहतात तर काय बिबट्या.

आदिवासी भागातील मुरशेत (ता. अकोले) येथे हा थरार घडला. दुंदा गोलवड यांचे कुटुंब येथे राहते. त्यांच्या घराशेजारील झाडावर रात्रीच्या वेळी कोंबड्या बसतात. भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या अंधारात बिबट्या या झाडावर चढला. दोन कोंबड्या जबड्यात पकडून त्याने झाडावरून उडी मारली.

हेही वाचा - राम शिंदेंना विकासातलं काय कळतं, रोहित पवारांचा टोमणा

त्याचा अंदाज चुकला नि बिबट्या घराच्या पत्र्यावर पडला. पत्रा तुटून तो थेट आत कोसळला. आत दूंदा गोलवड, त्यांची पत्नी जनाबाई, सून द्वारका, मुलगी साक्षी, समीर, विराज झोपले होते. आवाजाने सगळे जागे झाले. पाहतात तर, अंगावर बिबट्या बसलेला. कडाक्‍याच्या थंडीतही सगळे घामाने डबडबले. जनाबाई पलंगाखाली सरकल्या. 

द्वारका व साक्षी जीव मुठीत घेऊन बिबट्याकडे पाहत एकमेकींना धीर देत होत्या. समोर मृत्यू दिसत होता. घराचे दरवाजे बंद होते. ते उघडून बाहेर काढायचेही कोणात धाडस नव्हते. 

कारण बिबट्या त्यांच्या समोर होता. सर्वच निपचित पडून होते. सर्वच देवाचा धावा करीत होते. बिबट्याही घाबरलेल्या अवस्थेत होता. तो सर्वांच्या अंगावरून चालत गेला नि चुलीवर चढून खिडकीत उडी घेतली. तेथून कौले तोडून त्याने पुन्हा घरावर उडी घेतली नि बाहेर पडला. बिबट्या बाहेर पडताच, सगळ्यांच्या अश्रूचा बांध फुटला. 

घरासमोरील पडवीत दूंदा गोलवड झोपले होते. कौलांचा आवाज झाल्याने ते बाहेर पडले, तर समोर बिबट्या. त्यांचीही बोबडी वळली. मात्र, महिलांच्या आवाजाने शेजारी धावले. कुत्री भुंकू लागले. बिबट्या आल्या पावली परतला. बिबट्याच्या भीतीने गावाचीच झोप उडाली. आता रोज रात्री जागता पहारा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

गाईच्या नरडीचा घेतला घोट

दुसरी घटना तालुक्‍यातील समशेरपूरची. तेथील मच्छिंद्र रामनाथ भरीतकर यांच्या घरासमोर बांधलेल्या गाईस दोन बिबट्यांनी एकत्र येत तिची शिकार केली. रात्रीच्या अंधारात हे बिबटे मंडलिक यांच्या शेताशेजरील घरासमोर आले नि त्यांच्या गाईच्या नरडीचा घोट घेतला. भरीतकर सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना हा थरार दिसला. विभागाचे वनक्षेत्रपाल जयराम गोंद के यांनी घटनास्थळी भेट दिली पंचनामा केला असता त्यांनी दोन बिबटे असल्याचे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image