(व्हिडीओ) भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत, तासाभराच्या प्रयत्नानंतर जेरबंद 

सनी सोनावळे
Wednesday, 13 May 2020

गारगुंडी रोडवर हनुमंत लोंढे यांच्या शेतात कोरडी विहीर आहे. आज दुपारी दोनच्या दरम्यान हनुमंत लोंढे यांचा मुलगा रामदास लोंढे हे शेतात जात असताना, विहिरीतून वन्यप्राण्याचा आवाज त्यांना ऐकू आला.

टाकळी ढोकेश्वर : भक्ष्याच्या शोधात कान्हुर पठार (ता. पारनेर) येथील गारगुंडी रस्त्यावरील हनुमंत लोंढे यांच्या कोरड्या विहिरीत बिबट्या पडला. नगर येथील व्हाईड लाईफ रेस्क्‍यू सोसायटी टीमच्या मदतीने तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले.

याबाबत माहीती अशी की : गारगुंडी रोडवर हनुमंत लोंढे यांच्या शेतात कोरडी विहीर आहे. आज दुपारी दोनच्या दरम्यान हनुमंत लोंढे यांचा मुलगा रामदास लोंढे हे शेतात जात असताना, विहिरीतून वन्यप्राण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, आत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर वनपाल डी. के. तिकोणे घटनास्थळी आले. त्यांनी पारनेर येथील वन विभागाच्या कार्यालयास कळविले. तोपर्यंत लोंढे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावभर झाली होती. त्यामुळे विहिरीभोवती बघ्यांची गर्दी झाली. 

bibtya

कान्हुर पठार (ता. पारनेर) : कोरड्या विहीरीत पडलेला बिबट्यास बाहेर काढताना व्हाईड लाईफ रेस्क्‍यू सोसायटी टीमचा सदस्य नजीर शेख. (छायाचित्र : सनी सोनावळे) 

तासाभरानंतर बिबट्या जेरबंद

नगर येथील व्हाईड लाईफ रेस्क्‍यू सोसायटी टीमचे आकाश जाधव, अतुल पाखरे, ऋषिकेश परदेशी, रितेश हुशार, प्रमोद खामकर यांनी टीममधील नवाज शेख यास दोरीने विहिरीत सोडले. त्याने काठीद्वारे बिबट्यास धक्का देत पिंजऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानतर अखेर बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला आणि त्यास जेरबंद करण्यात आले. परिसरातील नागरिकांनीही बिबट्याला पकडण्यासाठी मदत केली. 

बिबट्याचा मानवी वस्तीकडे मोर्चा

वनसंरक्षक एन. बी. शिंदे, वनपाल सी. ए. रोडे, एन. व्ही. बढे, जी. बी. वाघमारे, व्ही. जी. सूर्यवंशी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. झपाट्याने कमी होत जाणाऱ्या जंगलांमुळे मार्जार कुळातील वाघ, सिंह, चित्ता या प्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. मात्र, अतिशय चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या बिबट्याने याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. मानवी आक्रमणामुळे वन्यप्राण्यांचा हक्काचा अधिवास नष्ट होत चालल्याने त्यांनी मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard was rescue from the well after an hour