श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना एक हजार कोटींचे कर्ज देणार

संजय आ. काटे
Thursday, 19 November 2020

कोरोना संकटात शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी जिल्हा बँक सरसावली आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरोना संकटात शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी जिल्हा बँक सरसावली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक व पशुपालन कर्ज देताना कुठलाही दुजाभाव होणार नसून दोन्ही प्रकारचे जवळपास एक हजार कोटींचे कर्ज देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातील निम्म्या कर्जाचे वितरणही केल्याची माहिती बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचवण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा सहकारी बँकेने लोणीव्यंकनाथ व खामकरवाडी सहकारी सोसायटीतील सभासदांना सुमारे 50 कोटीचे कर्जाचे धनादेश लोणीव्यंकनाथ येथे आयोजीत केलेल्या कर्ज वितरण सोहळ्यात जिल्हा बॅकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा होते. 

पानसरे म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्याला गरज असेल त्यावेळी कर्ज देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कोरोना संकट बळावल्याने शेतकरी अडचणीत आला. त्यावेळी बँकेने पुढाकार घेतला. श्रीगोंद्यात शंभर कोटींचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट असताना आजपर्यंत 329 कोटींचे वाटप केले असून पीक कर्जाचा आकडा पाचशे कोटींच्या पुढे जाणार आहे. आता नाबार्ड अंतर्गत पशुपालनासाठी बँक कर्ज देत असून श्रीगोंद्यात त्यासाठी 166 कोटींची मंजूरी आहे. मात्र हेही कर्ज पाचशे कोटींच्या घरात देण्याचा प्रयत्न राहिल. 

नाहाटा म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम पानसरे यांनी केले आहे. भविष्यातही त्यांच्यासारखा संचालक तालुक्याला मिळावा यासाठी आपण पुढाकार घेवू. 

पंचायत समिती सदस्य अण्णा शेलार, बॅकेचे तालुका विकास अधिकारी वसंत जगताप, राजेंद्र म्हस्के, टिळक भोस बापुराव वाबळे, रावसाहेब काकडे, ज्ञानदेव गवते, विलास काकडे, मोहन काकडे, दत्तात्रय खेडकर, रामदास ठोंबरे, बाबासाहेब कुंदाडे, सुनिल पाटील उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A loan of Rs one thousand crore will be given to farmers in Shrigonda