नगर जिल्हा परिषदेला दीडशे कोटींचा फटका

दौलत झावरे
Sunday, 25 October 2020

कृषी विभागाच्या मदतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यात जिल्हा परिषदेचे किती नुकसान झाले, याची माहिती तातडीने विभागीय आयुक्तांनी मागविली होती.

नगर ः जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्याचे काम महसूल प्रशासनाने सुरू केले आहे. पिकांसह जिल्हा परिषदेने केलेले रस्ते, पूल, शाळाखोल्या, निवासी इमारती, ग्रामपंचायत कार्यालय, पाझर तलाव आदींचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे आकडे वगळता, जिल्हा परिषदेला सुमारे 148 कोटी 88 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

कृषी विभागाच्या मदतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यात जिल्हा परिषदेचे किती नुकसान झाले, याची माहिती तातडीने विभागीय आयुक्तांनी मागविली होती. त्यामुळे आज मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांकडून नुकसानीचा आढावा घेतला.

त्यात सुमारे 1230 रस्ते व पूल, शाळाइमारती, ग्रामपंचायत इमारती, निवासी इमारतींचे सुमारे 148 कोटी 80 लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले. 
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेले 801 रस्ते व पुलांचे सुमारे 141 कोटी 50 लाख 69 हजार, 30 शालेय इमारतींचे 29 लाख दोन हजार, ग्रामपंचायत विभागांतर्गत 292 निवासी इमारतींचे 94 लाख 64 हजार, 11 ग्रामपंचायत इमारतींचे 12 लाख 65 हजार, 48 पाझर तलाव, गावतलाव, बंधाऱ्याचे पाच कोटी 87 लाख, तसेच पशुसंवर्धन विभागांतर्गत 48 जनावरांचे सहा लाख दहा हजारांचे नुकसान झाले आहे. 

दरम्यान, एक जून ते 30 सप्टेंबरदरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. त्यात 65 हजार हेक्‍टरला बाधा निर्माण झाली असून, त्यात शेतकऱ्यांचे 58 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यानंतर एक ते 24 ऑक्‍टोबरदरम्यानच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये कृषीसह जिल्हा परिषदेचे रस्ते, शाळांच्या इमारतींच्याही पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of Rs.150 crore to Nagar Zilla Parishad