esakal | पाऊस सुरू तरी गंगापूर व दारणा धरणात पाण्याची आवक मंद गतीने
sakal

बोलून बातमी शोधा

dam

पाऊस सुरू तरी गंगापूर व दारणा धरणात पाण्याची आवक मंद गतीने

sakal_logo
By
टिम इ सकाळ

शिर्डी (जि. अहमदनगर) : कोकणात मुसळधार व सह्याद्रीच्या घाटमाथ्यापलीकडे वारे गारेगार, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने थोडा जोर धरल्याने गोदावरी कालव्यांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या दारणा धरणातून वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यास आज सुरवात झाली. पाणीसाठा ७३ टक्क्यांवर गेल्याने आता कुठल्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडले जातील. तथापि, कोकणात मुसळधार कोसळत असलेल्या पावसाच्या तुलनेत गंगापूर व दारणा धरणसमूहात पाण्याची आवक मंद गतीने सुरू आहे. (low-water-storage-in-Gangapur-and-Darna-dam-marathi-news)

पावसाचा जोर वाढल्यास चित्र बदलेल

दारणा समूहातील मुकणे धरणात ३४ टक्के, तर दीड ते दोन टीएमसी साठवण क्षमता असलेल्या भाम धरणात ३३ टक्के, भावलीमध्ये ८६ टक्के व वाकीत १३ टक्के, असा पाणीसाठा आहे. पावसाने दारणा समूहातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुक्काम ठोकला असला, तरी त्याचा जोर कमी आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर गेला. येत्या एक-दोन दिवसांत पावसाचा जोर वाढला, तर चित्र बदलू शकते.

आज तरी पाणीसाठ्यांची परिस्थिती जेमतेम आहे. कारण, खालच्या बाजूला असलेले शंभर टीएमसी क्षमतेचे महाकाय जायकवाडी धरण निम्मेच भरले आहे.

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

कोकणात अभूतपूर्व वृष्टी सह्याद्रीपलीकडे अवर्षण

तथापि, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला नसला, तरी त्यांच्या खालच्या बाजूला आज जोरदार पाऊस झाल्याने, दारणा व गोदावरी नद्या वाहत्या झाल्या. त्याचा परिणाम म्हणून मध्यमेश्वर मध्यम प्रकल्पावरून सकाळी आठच्या सुमारास सहा हजार क्यूसेक वेगाने पाणी गोदावरी नदीतून वाहण्यास सुरवात झाली. मात्र पाऊस थांबल्याने अवघ्या चार तासांत हे पाणी बंद झाले.

''कोकणात अभूतपूर्व वृष्टी सुरू आहे. मात्र, सह्याद्रीपलीकडील नाशिक, नगर, धुळे व जळगाव या जिल्ह्यांत अद्यापही हवेचा दाब तुलनेत जास्त आहे. त्यामुळे कोकणात धो-धो बरसणारे महाकाय ढग आपल्याकडे खेचले जात नाहीत. त्यातून ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली. तिकडे अतिवृष्टी, तर इकडे अवर्षण, असा विरोधाभास निर्माण झाला.'' - उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

(low-water-storage-in-Gangapur-and-Darna-dam-marathi-news)

हेही वाचा: गटारीचे पाणी मिसळल्याने गोदावरी वाहू लागली दुथडी भरुन!

loading image
go to top