Maharashtra education: मुलांना गृहपाठ हवा की नको? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra education

Maharashtra education : मुलांना गृहपाठ हवा की नको?

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी तीन-साडेतीन वर्षांच्या एका मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षांच्या कोवळ्या जीवाने क्षणाचाही विलंब न करता ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही, तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ॲम्ब्युलन्सला फोन करायचा असते, हे कसे समजले? आणि ॲम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला, या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात. शाळेत केलेल्या प्रात्यक्षिकामुळे त्या मुलीला शिक्षण मिळाले.

गेली दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या चर्चा करत राहिलोय, पण या ओझ्याचे काय? फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? याला पालकही जबाबदार नाहीत का? त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणित, इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय. सर्व शाळा त्या कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणिताचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याच मुलांना कुठे चांगले गणित येते? जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते? आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा-बारा वर्षांत कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहीत होते?

स्पर्धांची गरज आहे का?

मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टहास का? गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? तो आई- वडिलांबरोबर आजी- आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयांत, सगळ्याच खेळांत, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमांत इतर शाळांच्या पुढे असलीच पाहिजेत, हा शाळांचा पण अट्टहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत, तेवढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत.

शाळा आणि पालक या दोन्हींच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोकांना विचारून खात्री करून घेतायत, की खरेच आज गृहपाठ नाही ना? माझे मूल सर्वच विषयांत, सर्वच खेळांत, सर्वच कलांत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे, हापालकांचा अट्टहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रांत यशस्वी झाली पाहिजेत, हा शाळांचा अतिमहत्त्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमनांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहे, हे अभ्यासायला हवं.

Web Title: Maharashtra Education Minister Homework School Teacher Parents Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..