
बँकेतील ही लढाई भाजप विरूद्ध महाविकास आघाडी झाली. त्यातही विखे विरूद्ध थोरात असाच हा सामना झाला.
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा सहाकारी बँकेत चार जागांसाठी काल मतदान झाले. त्याची मतमोजणी आज झाली. मतदारांनी महाविकास आघाडी आणि भाजपला समान संधी दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा मिळवल्या. यापूर्वी सतरा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात आजीमाजी आमदार-खासदार मंत्र्यांचा समावेश आहे.
बँकेतील ही लढाई भाजप विरूद्ध महाविकास आघाडी झाली. त्यातही विखे विरूद्ध थोरात असाच हा सामना झाला. यात विखे गटाला यापूर्वी दोन जागा बिनविरोधमध्ये मिळाल्या आहेत. एकंदर बँकेत महाविकास आघाडीने भाजपला चारीमुंड्या चीत केले आहे. या निवडणुकीत थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. परंतु महाविकास आघाडीने त्यांची रणनीती चालू दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकेका जागेसाठी फिल्डिंग लावली होती. त्यात ते यशस्वी झाले.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यभामा बेरड यांना कर्डिले यांनी एकतर्फी पराभूत केलं.
कर्जत येथील अंबादास पिसाळ यांना विखे यांची रसद होती. त्यांच्या विरोधात होत्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षीताई. त्या विद्यमान संचालक होत्या. ही लढत सर्वात काट्याची ठरली. पिसाळ यांनी अवघ्या एका मताने येथे विजय मिळवला.
पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान संचालक उदय शेळके यांनी शिवसेनेच्या रामदास भोसले यांच्यावर एकतर्फी मात केली. येथेच राष्ट्रवादी-काँग्रेस विरूद्ध शिवसेना-भाजप असा सामना होता. तेथे महाविकास आघाडी वरचढ ठरली.
बिगर शेती संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रशांत सबाजीराव गायकवाड यांच्यासमोर श्रीगोंद्याच्या दत्ता पानसरे यांनी आव्हान उभे केले होते. त्यांच्यावर गायकवाड यांनी मात केली.
कर्जतला नेमके काय झाले
पिसाळ हे विखे समर्थक म्हणून ओळखले जातात. जामखेडमध्येही राळेभात बिनविरोध निवडून आले आहेत. तेही विखे गटाचे आहेत. तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आमदार रोहित पवार यांनी अर्ज माघारी घ्यायला लावून बेरजेचे राजकारण केलं. परंतु कर्जतमध्ये बिनविरोधची किमया साधता आली नव्हती. त्यामुळे तेथे लढत लागली होती. कर्जतचा इतिहासच तुल्यबल लढतीचा आहे. मागे एकदा राष्ट्रवादीचे राजेंद्र तात्या फाळके आणि अंबादास पिसाळ यांच्या टाय झाला होता. त्यावेळी चिठ्ठीवर फाळके तात्यांनी बाजी मारली होती. यंदाही तीच स्थिती होती. परंतु पिसाळ एक जास्त मिळवण्यात यशस्वी ठरले.